
मराठा आरक्षण: मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा ‘मुंबई कूच’चा इशारा; गनिमी काव्याने मुंबईत पोहोचण्याचे आंदोलकांना आदेश
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील सर्व मराठा समाजाने हळूहळू मुंबईच्या दिशेने कूच करावे, असे स्पष्ट आदेश जरांगे पाटील यांनी दिले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून अंतरवाली सराटीत समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबईत आंदोलनाची धडपड सुरू करताना त्यांनी कार्यकर्त्यांना ‘गनिमी कावा’ वापरण्याचा सल्ला दिला आहे.

“गनिमी कावा वापरा, पाहुण्यांकडे सोय करा”

आंदोलनाची रणनीती स्पष्ट करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुंबईत कमीत कमी एक ते दोन लाख मराठा बांधवांची घरे आहेत. त्यामुळे पुढील सहा दिवसांत सर्वांनी मुंबईतील आपले पाहुणे आणि नातेवाईक शोधून राहण्याची सोय करावी.त्यांनी आंदोलकांना आवाहन केले की, “येत्या काही दिवसांत कमीत कमी ५ ते ५० लाख मराठा तरुणांनी मुंबईच्या दिशेने पुढे गेले पाहिजे. हळूहळू आणि शिस्तबद्ध मार्गाने मुंबईत दाखल व्हा.”

मुंबईतील ‘या’ दोन ठिकाणी जाणे टाळा
आंदोलकांना स्पष्ट सूचना देताना जरांगे यांनी दोन महत्त्वाच्या ठिकाणांचा उल्लेख केला. “सध्या कोणीही मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगला आणि आझाद मैदानाच्या दिशेने जाऊ नका. संपूर्ण मुंबईत जिथे जागा मिळेल तिथे राहा, पण या दोन ठिकाणी सध्या जाणे टाळा,” असे त्यांनी बजावले आहे.
“पोलिसांना त्रास देऊ नका, शिस्त बाळगा”
आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन करत जरांगे म्हणाले, “पोलिसांशी कोणताही वाद घालू नका. पोलीस काय खूप नाहीत, पण आपण त्यांना त्रास द्यायचा नाही. एखाद्याला पोलिसांनी ठाण्यात बोलावले तरी शांततेत जाऊन भेटून या. आंदोलन अत्यंत शिस्तबद्ध मार्गाने झाले पाहिजे.”
प्रशासन आणि पोलिसांची चिंता वाढली
मनोज जरांगे पाटील यांच्या या नव्या आदेशामुळे राज्यातील मराठा आंदोलक पुन्हा एकदा ॲक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. यामुळे राज्य प्रशासन आणि पोलीस यंत्रणेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वीही मराठा आंदोलकांनी मुंबईत धडक दिली होती, त्यावेळी दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती. आता पुन्हा एकदा लाखो आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाल्यास मोठी कोंडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

