महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे नाना पटोलेंचा सहभाग?
विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळेच एकनाथ शिंदेचे बंड?पटोलेंवर आरोप काय
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- माजी आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर पक्षातुनही निलंबित करण्यात आले आहे. पण त्यानंतरही देशमुख यांनी नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करत नाना पटोले यांच्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्याचा दावा केला आहे.
महाराष्ट्रात जे राजकीय नाट्य सुरु आहे त्यात नाना पटोले यांचा सहभाग असल्याचा दावा केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडण्यामागे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह नाना पटोले यांचाही सहभाग असल्याचा आरोप आशिष देशमुख यांनी केला आहे. ते म्हणाले, “नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देताना महाविकास आघाडी किंवा काँग्रेस पक्षातील मोठ्या नेत्यांना विश्वासात घेतले नव्हते. अगदी शरद पवार आणि संजय राऊत यांनाही काही माहित नव्हते. काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे इतर माजी मुख्यमंत्र्यांनाही त्याची माहिती नव्हती. त्यामुळे नाना पटोले यांच्यासंदर्भात संशय बळावतो कारण नाना पटोले यांनी ज्या दिवशी विधानसभेचे अध्यक्षपद सोडले, तेव्हापासूनच संशयाची सुई त्यांच्याकडे आहे. चंद्रकांत हांडोरे यांचा पराभवातही त्यांचा सहभाग असू शकतो, असा दावा करत माझ्याऐवजी नाना पटोले यांची चौकशी करा. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा कोणाला न सांगताच दिला आणि त्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार पडलं,” असा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. नाना पटोले यांना खोका मिळतो असा माझा शब्द होता. त्याचा जो अर्थ तुम्हाला लावायचा आहे, ते तुम्ही लावा. पक्षाकडे त्यांची चौकशीची मागणी मी करत असल्याचेही आशिष देशमुख म्हणाले आहेत.
देशमुख यांनी यावेळी राहुल गांधीनी माफी मागितली पाहिजे यावर ठाम असल्याचे सांगितले. राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची जाहीर माफी मागावी, माझे हे वक्तव्य पक्षाच्या हिताचेच आहे. कारण राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर राफेल आणि चौकीदार चोर आहे, या प्रकरणात जाहीर माफी मागितली आहे. असा दावा देशमुख यांनी केला.