
पुण्यात विद्यार्थ्याची सुरक्षा धोक्यात? हॉस्टेलच्या रूमवर अंडी फोडून विद्यार्थ्याचा मानसिक छळ; वरिष्ठ विद्यार्थ्यांच्या कृत्याने संताप.
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यात त्यातही कायद्याचे धडे देणाऱ्या नामांकित ‘आयएलएस लॉ कॉलेज’मध्ये रॅगिंगचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे.एका बाजूला रॅगिंगमुक्त शिक्षणाची स्वप्ने पाहत असताना दुसरीकडे भावी कायदेतज्ज्ञ घडवणाऱ्या संस्थेतच एका विद्यार्थ्याला अमानुष मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

ओंकार लोखंडे या विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, हा केवळ खोडसाळपणा नसून छळ होता. वसतिगृहातील दारू आणि अंमली पदार्थांच्या पार्ट्यांबाबत प्रशासनाला माहिती दिल्याच्या संशयावरून ओंकारला लक्ष्य करण्यात आले. त्याच्या रूमच्या दरवाजासमोर अंडी फोडणे, दरवाजावर अश्लील शिव्या लिहिणे, वीजपुरवठा खंडित करून घोळक्याने शिव्या देणे असे प्रकार सलग घडत होते.पोलीस तक्रार झाल्याने खळबळ.समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील प्रतिष्ठित विधी महाविद्यालयाच्या वसतिगृहात विद्यार्थ्याचे रॅगिंग केल्याप्रकरणी पाच विद्यार्थ्यांविरुद्ध डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महाविद्यालयाच्या अंतर्गत समितीने यापूर्वीच या प्रकरणाची चौकशी करून रॅगिंग झाले नसल्याचा अहवाल दिला होता, मात्र आता थेट पोलीस तक्रार झाल्याने खळबळ उडाली आहे.
कॉलेज प्रशासनावर कारवाई.

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे महाविद्यालय प्रशासनाचे उदासीन धोरण असा आरोप करत ओंकार म्हणाला, मी तक्रार करूनही ठोस कारवाई करण्याऐवजी केवळ रूम बदलून दिली. मी मानसिक तणावात होतो, त्यामुळे एक पेपर देखील दिला नाही. कॉलेजच्या प्रशासनाकडे पहिल्या दिवसापासून या प्रकरणाकडे डोळेझाक केली आहे. सरळ सरळ प्रोत्साहान दिले त्यामुळे कॉलेज प्रशासनावर कारवाई झाली पाहिजे.पोलीस स्थानकात गुन्हा दाखल.दिलेल्या तक्रारीनुसार, त्याचे वय जास्त असल्याने विशीतील काही सहकाऱ्यांनी त्याला लक्ष्य केले. वसतिगृहाच्या आवारात त्याच्यावर विनोद करणे, टोमणे मारणे आणि मानसिक छळ करणे असे प्रकार घडले. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा, 1999 च्या कलम 3आणि 4 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे, रॅगिंगविरोधी कडक कायदे असतानाही आयएलएस सारख्या संस्थेत हे घडणे म्हणजे दिव्याखाली अंधार आहे. जे विद्यार्थी उद्या न्यायालयात न्यायाची भाषा करणार आहेत, त्यांनीच आज एका विद्यार्थ्याचे जगणे असह्य करावे, ही चिंतेची बाब असल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहे.


