भाजपासोबत जाऊन चूक झाली, पण भाजपालाही धोकाच
शिंदे गटातील आमदाराची खदखद समोर, भाजपाने विश्वासघात केल्याचा आरोप, दिला मोठा इशारा
मुंबई दि ७(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी भाजपाबरोबर हातमिळवणी करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. एवढच नाही तर त्यांच्यासोबत आठ मंत्र्यांचा शपथविधीही पार पडला पण त्यामुळे शिंदे गटात मात्र अस्वस्था वाढली आहे. त्यातच शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपाला मोठा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे युतीतील नेते मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसले असताना अचानक अजित पवार सत्तेत सामील झाले. बच्चू कडू हे तर मंत्रिपदासाठी गुढग्याला बाशिंग बांधून तयार आहेत. आता त्यांनी मोठे विधान केले आहे. बच्चू कडू म्हणाले की, आपण राष्ट्रवादीला कंटाळून भाजपकडे गेलो होतो, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आम्हाला काम करू देत नाही, असाच सूर होता. आता भाजपने राष्ट्रवादीला जवळ केल्याने भाजपला साथ देणे चुकीचे ठरल्याची भावना आमदारांमध्ये झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या ४० आमदारांची मोठी गोची झाली आहे. आता अजित पवार हे पुन्हा निधी खेचून घेतील, आमच्या निर्णयात आडवे येतील अशी भीती आहे. त्यामुळे या आमदारांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशी भीती कडू यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर कडू यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ” भाजपला पक्ष मजबूत करायचा आहे, पण सोबत आलेले लोक खड्ड्यात गेले, तरी चालतील, हा त्यांचा विचार चुकीचा आहे. उलट यामुळे भाजपचेच जास्त नुकसान होणार आहे. दुसऱ्या लोकांना सोबत घेताना पहिल्या लोकांना खड्ड्यात टाकायचे, ही भूमिका राजकारणात टिकत नाही. अशा शब्दात बच्चू कडू यांनी भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळे युतीतील खदखद आता समोर येऊ लागली आहे.
आम्ही सरकारमधील घटक पक्ष आहोत, राष्ट्रवादीला सोबत घेण्यापुर्वी किमान आमच्यासोबत चर्चा करायला हवी होती. पण तसे झाली नाही. भाजपला सरकारमध्ये समर्थकांची संख्या वाढवायची आहे, ते त्यांनी जरूर करावे, पण जुन्या लोकांचाही विश्वासघात होणार नाही. याची काळजी घ्यायला हवी होती. भविष्यात त्याचे परिणाम दिसून येतील. असा इशारा देखील बच्चू कडू यांनी भाजपाला दिला आहे.