
मोठी बातमी! जयंत पाटील यांच्या भावाचा भाजपात प्रवेश
भाजपाने केला करेक्ट कार्यक्रम, भावाचा जयंत पाटलांना इशारा म्हणाले पाटील काय आहे ते इतरांना कळेल...
रायगड – शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे भाऊ पंडित पाटील यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. त्यामुळे शेकापला जोरदार धक्का बसला आहे, तर भाजपाची ताकत वाढणार आहे.
पंडित पाटील यांच्या पक्ष प्रवेशानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचे बळ आणखी वाढणार आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पंडीत पाटील यांनी भाजपाचा झेंडा हातात घेतला. यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी तुफान फटकेबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य नदी आहेत. म्हणून मी भाजपात आलो. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी भाजपात प्रवेश केला असे पंडीत पाटील म्हणाले. शेकापच्या माध्यमातून आम्ही खासदार केले. आमच्या शिडीने अनेक लोक वर गेले पण कार्यकर्ता संपला. गेल्या निवडणुकीत आम्ही तटकरेंना खासदार केले, आघाडी मार्फत खासदार झाले, पण आम्हाला ते विसरले, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टिका केली. विधानसभा निवडणुकीच्यावेळी माजी आमदार पंडीत पाटील यांनी पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांच्याकडे उमेदवारी मागितली होती. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा पराभव करण्याकरिता पंडीत पाटील हेच सक्षम उमेदवार असल्याचा दावा त्यावेळी शेकापमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केला होता. मात्र पंडीत पाटील यांना तिकीट नाकारुन ते माजी आमदार जयंत पाटील यांच्या स्नूषा चित्रलेखा पाटील यांना देण्यात आले. तिकीट नाकारल्याने पंडीत पाटील आणि पक्षांतील त्यांचे समर्थक नाराज झाले होते. दरम्यान माझ्या पक्ष प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात भाजप एक नंबरला येणार असल्याचा दावा माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी केला आहे.
रायगड जिल्ह्यात मला मानणारा मोठा वर्ग असून त्याचा भारतीय जनता पार्टीला मोठा फायदा होईल, शिवाय आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीत पंडितशेठ पाटील काय आहे ते इतरांना कळेल, असा इशारा त्यांनी शेकाप नेत्यांना दिला आहे.