
कोंढवा परिसरात दोन लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून मोठा वाद निर्माण झाल्याची घटना काल समोर आली आहे. या घटनेत मोठ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर दोन गट आमनेसामने आले आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले असून काही जणांकडून कोंढवा पोलीस ठाणे येथेही दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील दोन लहान मुलांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. सुरुवातीला हा वाद स्थानिक पातळीवर मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यानंतर काही मोठी मंडळी या वादात सहभागी झाल्याने वातावरण अधिक चिघळले. दोन्ही गटांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि काही वेळातच दगडफेक सुरू झाली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, जमाव आक्रमक झाल्याने काही जणांनी कोंढवा पोलीस ठाण्यावरही दगडफेक केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरिक पोलीस स्टेशनबाहेर जमा झाले. काही नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला. त्यामुळे परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.तसेच, दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


