
पायधुनी ‘मर्डर मिस्ट्री’चा उलगडा! कलिंगडामुळे नाही, तर ‘या’ भयानक औषधामुळे संपलं कुटुंब; तपासात हादरवणारे सत्य समोर
मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचा झालेला गूढ मृत्यू सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. सुरुवातीला ‘कलिंगड’ खाल्ल्याने हा मृत्यू झाल्याची चर्चा होती, मात्र आता जे. जे. हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक अहवालातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू कलिंगडामुळे नाही, तर उंदीर मारण्याचे जहाल औषध खाल्ल्याने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

नेमकी काय आहे नवी अपडेट?

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, २६ एप्रिल रोजी डोकाडिया कुटुंबाने विषप्राशन केले होते. हे विष उंदीर मारण्याचे औषध असल्याचे निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या जहाल औषधाची उग्र चव घालवण्यासाठी कुटुंबाने त्यानंतर कलिंगड खाल्ले होते.

डॉक्टरांच्या निरीक्षणातील महत्त्वाचे मुद्दे
मृतांच्या दातांमध्ये अडकलेले औषध कलिंगडाच्या कापांनाही लागले होते.फॉरेन्सिक तपासणीत मृतकांच्या शरीरात आणि कलिंगडाच्या उर्वरित भागांतही उंदीर मारण्याच्या औषधाचे अंश सापडले आहेत.हे औषध बाजारात मिळणारे सामान्य ‘रॅट पॉयझन’ नसून, लॅबोरेटरीमध्ये वापरले जाणारे १०० टक्के कॉन्सेंट्रेटेड ‘झिंक फॉस्फेट’ असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ती काळरात्र आणि संशयाचे जाळे
२६ एप्रिलच्या रात्री अब्दुल्ला डोकाडिया (४४), पत्नी नसरीन (३५), मुली आयेशा (१६) आणि झैनब (१३) यांनी रात्री बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर कलिंगड खाऊन ते झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी हे चौघेही मृतावस्थेत आढळले. घटनास्थळी कलिंगड कापलेले दिसल्याने, सुरुवातीला कलिंगडातून विषबाधा झाल्याची अफवा पसरली होती, ज्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण होते.
गूढ अजूनही कायम;हे आत्महत्या की घातपात?
पोलिसांच्या तपासात उंदीर मारण्याचे औषध समोर आले असले तरी, आता नवीन प्रश्न उपस्थित झाले आहेत:
१. कुटुंबाने हे औषध स्वतःहून खाल्ले की त्यांना अन्नातून दिले गेले?
२. जर हे लॅबोरेटरीमध्ये मिळणारे ‘झिंक फॉस्फेट’ असेल, तर ते त्यांच्याकडे आले कुठून?
३. औषधाची चव घालवण्यासाठी कलिंगड खाल्ले गेल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे, त्यामुळे हे पाऊल सामूहिक आत्महत्येचे होते का?
पोलिसांचा पुढचा तपास
पायधुनी पोलीस आता या औषधाच्या स्त्रोताचा शोध घेत आहेत. हे औषध कुठून खरेदी केले गेले आणि त्या रात्री घरात नेमके काय घडले, याचा सविस्तर तपास सुरू आहे. ‘कलिंगड’ केवळ एक निमित्त ठरले असून, मृत्यूचे खरे कारण हे जहाल रसायन असल्याचे आता सिद्ध झाले आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलीस लवकरच या प्रकरणाचा अंतिम अहवाल सादर करण्याची शक्यता आहे.

