पुण्यातील या वर्दळीच्या भागात बिबट्याचे दर्शन
बिबट्या डरकाळी फोडतानाचा व्हिडिओ व्हायरल, नागरिक भयभीत
पुणे दि १६(प्रतिनिधी)- जसे जसे सिमेंटची जंगले वाढत जातील तसतसा वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीकडे कल वाढत चालला आहे.औद्योगिकीकरणामुळं जंगलं नाहीशी होत असल्यामुळं बिबट्यांसह हिंसक प्राणी शहरांच्या दिशेनं धाव घेत असल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहे.आता पुण्यासारख्या दाट मानवी वस्तीत बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली आहे.
पुणे जिल्ह्यातील चाकणच्या एकता नगर परिसरात काही नागरिकांना बिबट्या दिसून आला आहे. याशिवाय शिवारात राहणाऱ्या नागरिकांना बिबट्याची मध्यरात्री बिबट्याची डरकाळीही ऐकू आली आहे. त्यानंतर नागरिकांना ग्लॅडिओलस इंग्लिश मीडियम स्कूलच्या परिसरात बिबट्याचं दर्शन झालं आहे. त्यानंतर आता परिसरातील लोकांनी जनावरं आतील गोठ्यात बांधायला सुरुवात केली आहे. याशिवाय मध्यरात्री नोकरीसाठी किंवा शेतात पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड या तालुक्यात अनेकदा शेतात नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत असते. मात्र, बिबट्याचे आता शहरात देखील दर्शन होऊ लागले आहे. बिबट्याच्या डरकाळ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर ऐकायला येत असून वनविभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा आणि बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. बिबट्याचा डरकाळी फोडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
चाकण ही महाराष्ट्रातील मोठी औद्योगित वसाहत आहे. नोकरीच्या निमित्तानं देशभरातून अनेक लोक चाकण परिसरात येत असतात. याशिवाय चाकणमध्ये शेतकऱ्यांचंही मोठं प्रमाण आहे. दरम्यान वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाने येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी पिंजरे लावले आहेत.