
पैलवान सिकंदर शेखच्या लढतीतील पंचांना फोनवरुन धमकी
सिकंदर शेखवर अन्याय केल्याचा आरोप, ऑडिओ क्लिप व्हायरल
पुणे दि १६(प्रतिनिधी)- पुण्यात पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या माती विभागातील अंतिम लढतीमध्ये सिंकदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्या लढतीदरम्यान पंचांनी दिलेल्या निर्णयावरुन टिका होत असतानाच स्पर्धेतील पंच मारुती सातव यांना मुंबई पोलिस दलातील शिपायाने धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्र केसरीच्या माती विभागात सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाडला चार पॉइंट दिल्याने महाराष्ट्रभर वाद गाजत आहे. सिकंदरच्या समर्थकांनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. तर आता पंच मारुती सातव यांना पोलीस दलातील कांबळेने धमकी दिली आहे. यासंदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यामध्ये संग्राम कांबळे यांनी मारुती सातव यांना तुम्हाला मुलगा आहे की मुलगी असं सांगा विचारलं. मारुती सातव यांनी मुलगा आहे, असं सांगितल्यावर कांबळे यांनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगा तुम्ही दिलेला निर्णय योग्य होता का सांगा, तुम्हाला लाज वाटली पाहिजे असे म्हणत तुम्ही दबावात चुकीचा निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे. पंच मारुती सातव यांनी स्पर्धा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. त्यानंतर आता कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात येणार आहे. पंच सातव यांनीपंचांनी काम कसं करायचं असा प्रश्न उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्यानंतर दरवेळी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. यावेळी सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्या लढतीमधील पंचांनी दिलेल्या ४ गुणांचा वाद निर्माण झाला आहे. पंचांनी ४ गुण दिल्यानं सिकंदर शेखवर अन्याय झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत. शेखच्या वडिलांनीही आपल्या मुलावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे.