Latest Marathi News
Ganesh J GIF

पत्नीची हत्या करणाऱ्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाला जन्मठेप

पोलीस दलातील सर्वाधिक गाजलेल्या प्रकरणाचा निकाल जाहीर, सास-याने जावायाला घडवली अद्दल

धाराशिव दि ११(प्रतिनिधी)- धाराशिव येथील जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांनी पत्नीच्या खुनात दोषी ठरवित येरमाळा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांना जन्मठेपेची तसेच ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. २५ जानेवारी २०१८ साली चव्हाण यांची पत्नी मोनाली यांना गोळी लागल्याने रूग्णालयात दाखल केले होते.

या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाणसह सासू विमल चव्हाण, सासरा बापू चव्हाण यांच्यावर देखील गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, सासू विमल चव्हाण आणि सासरा बापूराव चव्हाण यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांना जन्मठेपेची तसेच ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोनाली आणि विनोद चव्हाण यांचा २०१४ साली विवाह झाला होता. लग्नाच्या ४ वर्षानंतर म्हणजेच २५ जानेवारी २०१८ रोजी सकाळी येरमाळा पोलीस ठाण्यातील सपोनि विनोद चव्हाण यांची पत्नी मोनाली यांच्या छातीत गोळी लागल्याने त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला होता. मूल होत नाही या कारणावरून नैराश्येतून मोनाली यांनी पतीच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सांगितले गेले होते. पण मोनालीच्या वडिलांनी शेषांक जालिंदर पवार यांनी चारित्र्याच्या संशयावरून तसेच हुंड्यातील राहिलेली ५ लाख रुपयांची रक्कम आण म्हणून पतीनेच खून केल्याची तक्रार दिली. त्यानुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोनालीचे वडील शशांक पवार हे शिरूर पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत होते. त्यानंतर या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्याकडे देण्यात आला होता.

विनोद चव्हाण हे अटक झाल्यापासून कारागृहात आहेत, हे प्रकरण आरोपी न्यायालयीन कोठडीत (अंडर ट्रायल) ठेवून चालविले गेले हे विशेष. हे हत्याकांड त्यावेळी राज्यभर गाजले होते. न्यायालयाने दिलेल्या या निकालानंतर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!