
नाशिकमध्ये लिव्ह-इन पार्टनरची गळा चिरून हत्या; १८ तास मृतदेह घरात ठेवला, मध्यरात्री कारने कसारा घाटात फेकला!
नाशिकमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमधून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. एका ४० वर्षीय व्यक्तीची त्याच्याच लिव्ह-इन पार्टनरने मित्रांच्या मदतीने गळा चिरून हत्या केली. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह तब्बल १८ तास घरातच लपवून ठेवला आणि मध्यरात्री कारमधून नेऊन कसारा घाटात फेकून दिला. या प्रकरणी नाशिक क्राईम ब्रँचने मुख्य संशयित महिला हसीना शेखसह तिघांना ताब्यात घेतले आहे.

नेमकी काय आहे घटना?

वसंत गोरखनाथ सतपुते (वय ४०, रा. स्वराजनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कसारा घाट परिसरात एक अज्ञात मृतदेह आढळल्यानंतर नाशिक क्राईम ब्रँच युनिट-१ च्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. प्राथमिक तपासात मृतदेहाची ओळख पटल्यानंतर, हा मृतदेह नाशिकमधून कारद्वारे कसारा घाटात आणून फेकल्याचा संशय पोलिसांना आला.

१८ तास मृतदेह घरात अन् मध्यरात्री विल्हेवाट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत सतपुते यांच्या लिव्ह-इन पार्टनरने स्वतःच्या मित्रांच्या मदतीने पूर्वग्रहदूषित कटातून वसंत यांचा गळा चिरून खून केला. हत्येनंतर पकडले जाण्याच्या भीती पोटी त्यांनी मृतदेह तब्बल १८ तास घरातच ठेवून घेतला. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास संधी साधून कारच्या साहाय्याने मृतदेह कसारा घाटात नेऊन दरीत फेकून दिला. याप्रकरणी नाशिक क्राईम ब्रँचने तत्परता दाखवत खालील तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. हसीना शेख (लिव्ह-इन पार्टनर),साहिल शाह, मोइन शाह अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
दारू आणि जुगाराचे व्यसन हत्येला कारणीभूत?
मृत वसंत सतपुते यांच्या दारू आणि जुगाराच्या व्यसनामुळे घरात वारंवार वाद होत असल्याचे समोर येत असून, याच वादातून किंवा अनैतिक संबंधातून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांना आहे.सध्या नाशिक क्राईम ब्रँच या तिघांचीही पोलीस कोठडीत कसून चौकशी करत आहे. हत्येचा कट कुठे रचला गेला, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न कसे झाले, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

