
ठाण्यात शिंदेंच्या कार्यक्रमात गोंधळ; राष्ट्रगीताऐवजी वाजले ‘पुकार’ चित्रपटातील ‘वंदे मातरम्’, सर्वजण उभेच राहिले!
महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागासह विविध साहित्य संस्थांच्या वतीने आयोजित एका शासकीय कार्यक्रमात राष्ट्रगीताच्या वेळी मोठी तांत्रिक चूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीताऐवजी थेट बॉलिवूड चित्रपटातील गाणे वाजवण्यात आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

नेमका काय घडला प्रकार?

ठाण्यात बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाचा सांगता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम सुरु होताना ‘राष्ट्रगीताने (वंदे मातरम्)’ सुरुवात होणार असल्याची घोषणा व्यासपीठावरून करण्यात आली. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांसह सभागृहातील सर्वच मान्यवर आणि नागरिक आदराने उभे राहिले. मात्र, साउंड सिस्टीमवर राष्ट्रगीताऐवजी अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या ‘पुकार’ या हिंदी चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेले ‘वंदे मातरम्’ हे बॉलिवूड गाणे अचानक सुरू झाले.
चुकीचे गाणे वाजूनही उपमुख्यमंत्र्यांनी दिला सन्मान
विशेष म्हणजे, तांत्रिक चूक झाल्याचे लक्षात येऊनही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच उपस्थितांनी गाणे संपेपर्यंत स्तब्ध उभे राहून सन्मान राखला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री स्वतः या गाण्याच्या काही ओळी गुणगुणतानाही दिसत आहेत. हे बॉलिवूड गाणे पूर्ण संपल्यानंतर अधिकृत राष्ट्रगीत ‘जनगणमन’ वाजवण्यात आले.
तांत्रिक चुकीमुळे चर्चेला उधाण
एका महत्त्वाच्या शासकीय आणि साहित्यिक कार्यक्रमात अशी तांत्रिक चूक नेमकी कोणामुळे झाली, असा प्रश्न आता उपस्थित केला जात असून या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

