Latest Marathi News
Ganesh J GIF

लोकसभेच्या जागावाटपावर ६ जुलैला बैठक

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मुंबई व महाराष्ट्रात महिला असुरक्षित, केसीआरवर टिका

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- राज्यातील राजकीय परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. पाऊस उशिरा पडल्याने दुबार पेरणीचे संकट असून शेतकऱ्याला खते, बियाणे मोफत द्यावे यासाठी सरकारकडे पाठपुरावा करु आणि वेळपडली तर राज्यपालांकडे जाऊ. पावसामुळे मंबईत सहा लोकांचा हकनाक बळी गेला, मुंबईत जागोजागी पाणी साचून मुंबईकरांची प्रचंड झाले आहे त्यामुळे खर्च केलेले कोट्यवधी रुपये कुठे गेले? हा प्रश्न आहे. यासह लोकसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आला, ६ तारखेला पुन्हा बैठक घेऊन अंतिम चर्चा होईल व त्यानंतर अधिवेशनाआधी मित्रपक्षांशी चर्चा करु, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

बीकेसी येथील MCA क्लबमध्ये काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, बस्वराज पाटील, आ. प्रणिती शिंदे उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले पुढे म्हणाले की, राज्यातील सद्य परिस्थितीवर बैठकीत चर्चा करताना कायदा व सुव्यवस्थेवरही चर्चा करण्यात आली. पुण्यात दिवसाढवळ्या एका तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आले. महिला, मुलींवरील हल्ले, लैंगिक अत्याचारामध्ये वाढ झाली असून महिलांसाठी सुरक्षित असलेले मुंबई शहर व महाराष्ट्र शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात बिहार उत्तरप्रदेशसारखे जंगलराज झाले असल्याची जनतेची भावना झाली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही पण काँग्रेस पक्ष मात्र गंभीर आहे. काँग्रेसने राज्यपाल व पोलीस महासंचालक यांना भेटून यासंदर्भात अवगत केले आहे पण त्यात सुधारणा झालेला नाही. वेळप्रसंगी काँग्रेस पक्ष कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरेल असेही नाना पटोले म्हणाले. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्यासंदर्भात केलेल्या टीकेला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, भाजपा मुळ मुद्द्यांपासून पळ काढत असतो. शेतकरी, बेरोजगारी, महागाईवर काय केले त्यावर भाजपाकडे उत्तर नाही म्हणून ते हास्यकल्लोळ करण्याचा प्रयत्न करत असतात पण जनता त्यांच्या हास्यकल्लोळला ओळखून आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका करणे म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे आहे ही टीका भाजपाला महागात पडेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आजच्या बैठकीत १५ ते २० जागांवर चर्चा झाली आहे, अजून पूर्ण चर्चा झालेली नाही. पुढील बैठक ६ तारखेला होईल. सध्या काही जागांवर साधक-बाधक चर्चा सुरू आहे, महाविकास आघाडीसोबत आम्ही चर्चा करत आहोत. वज्रमूठ सभांना थोडा वेळ झाला आहे, हे आम्ही नाकारत नाही.

केसीआर संदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले की, सध्या ते कोणत्याही बैठकीत भाजप विरोधात भूमिका घेत नाहीत. पाटण्यातील विरोधी पक्षांच्या बैठकीला ते अनुपस्थित राहिले होते यावरून ते कोणाची B टीम आहेत हे स्पष्ट होते. ऐन निवडणुकांआधी हे सगळे सुरू झालं आहे. प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री नसीम खान यावेळी म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात मॉब लिंचिंगच्या दोन घटना झाल्या असून यात दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनांवरून राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही हे स्पष्ट होत आहे. राज्य सरकार या घटनांकडे राजकीय फायद्यासाठी दुर्लक्ष करत आहे का, हा प्रश्न असून सरकारने या दोन्ही घटनांचा गांभिर्याने तपास करावा व गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!