मोदी सरकारकडून सर्वसामान्य जनतेची लुट, तर राहूल गांधी…
भारत जोडोच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यभर विराट पदयात्रा, भाजपावर या नेत्याचे टिकेचे बाण
नागपूर दि ८(प्रतिनिधी)- भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षातर्फे पत्रकारपरिषदा, भारत जोडो पद यात्रा आणि सभांचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस नेत्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकारिषदा घेऊन महागाई वाढवून सर्वसामान्यांची लूट करणा-या मोदी सरकारची पोलखोल केली व त्यानंतर पदयात्रा काढून सभा घेतल्या.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली नागपुरमध्ये देवडिया भवनपासून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, दोन खासदार असलेला भाजपा आज बहुमताने केंद्रातील सत्तेत आला आणि देशाचे संविधान, लोकशाही संपवायचे काम करू लागला आहे. देशात विद्वेष पसरवला जात असताना राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढून देशातील वातावरण बदलले. पदयात्रेदरम्यान सर्व जाती धर्मांच्या लोकांना राहुल गांधी यांनी जवळ केले व त्यातून मोठे राजकीय परिवर्तन निर्माण केले. आपली लढाई देशाची लोकशाही व संविधान वाचवण्याची आहे त्यासाठी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने जनसंवाद यात्रा काढून संवाद साधला जात आहे. संगमनेरमध्ये विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली. संगमनेर नगरपालिका ते नवीन नगर रोड अशी विराट पदयात्रा काढण्यात आली. माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आय.टी.आय ते कुसुम सभागृह पर्यंत पदयात्रा काढण्यात आली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अकोला जिल्ह्यातील सौंदळा येथे पदयात्रेत सहभाग घेतला. लातूरमध्ये माजी मंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना आमदार अमित देशमुख म्हणाले की, भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे. या पदयात्रेमुळे संपूर्ण देशात सध्या परीवर्तनाचे वारे वाहत असून आगामी काळात देशात ‘इंडीया’ चे तर राज्यात ‘महाविकास आघाडी’ चे सक्षम सरकार सत्तारूढ होईल. देशात विद्वेषाच्या राजकारणामुळे सर्वत्र अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत इंडीया आघाडी कडून जनतेला हवा असलेला समर्थ पर्याय मिळाला आहे.
प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य चंद्रकांत हंडोरे यांनी नाशिक येथे, विधान परिषदेतील गटनेते माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी कोल्हापूर, सांगली येथे माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, परभणी येथे माजी मंत्री अनिल पटेल, नंदूरबार येथे माजी मंत्री के. सी. पाडवी, माजी मंत्री वसंत पुरके यांनी गडचिरोली येथे, पिंपरी चिचवड शहरात आमदार रविंद्र धंगेकर यांनी, भंडारा येथे नाना गावंडे, धुळे येथे प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, माजी मंत्री अनिस अहमद यांनी भिवंडी येथे, हिंगोली येथे प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम रेंगे, पुणे येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पद यात्रा काढली. यासह राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत भारत जोडो यात्रा काढण्यात आल्या. या यात्रेंमध्ये काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये सहभागी झाले होते.