Latest Marathi News
Ganesh J GIF

लम्पीग्रस्त दुग्धव्यवसायिक शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज

खासदार सुप्रिया सुळे यांची संसदेत मागणी,आजारावर प्रभावी लसीची गरज

दिल्ली, दि. २० (प्रतिनिधी) – लम्पी या आजारामुळे देशातील पशुधन आणि पर्यायाने दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. शेतकऱ्यांचे यामुळे अतोनात नुकसान झाले असून यावर्षी या आजारामुळे दीड लाखांहून अधिक (१,५५,७२४) जनावरे दगावली तर जवळपास तीस लाख (२९,५२,२२३) जनावरांना लागण झाली. परिणामी दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना पशुधन वाचविण्यासाठी मोठा खर्च करावा लागला. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबरोबरच त्यांच्या पशुधनावर मोफत उपचारही व्हायला हवेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.

लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत बोलताना त्यांनी महाराष्ट्रासह देशभरात लम्पी आजारामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला. या आजारामुळे हजारो शेतकऱ्यांनी पशुधन तर गमावलेच शिवाय त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे. परिणामी दुग्धव्यवसाय अडचणीत आला असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान लक्षात घेता सरकारने त्यांना मदत करणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.

ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत त्यांना आर्थिक मदत देण्याबरोबरच या आजाराचे उपचारही मोफत देण्याची गरज आहे, ही बाब खासदार सुप्रिया सुळे यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिली. लंपीचा प्रत्येक वेळी नवा विषाणू येत असल्याचे पशुतज्ज्ञांचे म्हणणे याचा अर्थ हा किती घातक आजार आहे, ते लक्षात घ्यायला हवे, असेही त्या म्हणाल्या. या रोगावर एकच लस प्रभावी ठरत नाही. त्यामुळे या रोगाचे आणखी संशोधन होऊन प्रभावी लस तयार केल्यास भविष्यात होणारे नुकसान टाळण्यास मदत होईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!