विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे धक्कातंत्र
'या' उमेदवाराला पाठिंबा देत तांबेसह भाजपाची कोंडी, असे असणार समीकरण
मुंबई दि १९(प्रतिनिधी)- राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून धक्कातंत्राचा वापर करत नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर करत बंडखोर सत्यजित तांबे आणि भाजपाची कोंडी केली आहे. महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत समर्थनाची घोषणा केली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेतून समर्थन असणाऱ्या उमेदवारांची घोषणा केली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले, अमरावती विभागात धिरज लिंगाडे, औरंगाबदमध्ये विक्रम काळे, नाशिकमध्ये शुभांगी पाटील आणि कोकणात बाळाराम पाटील असे पाच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असे सांगण्यात आले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाने याआधीच शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला होता. आता महाविकास आघाडीनेही पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी तरुणांत भाजपाविषयी राग आहे, हे समोर येत आहे. जगात सर्वात मोठा पक्ष असल्याचं गवगवा करणाऱ्या भाजपाला नाशिकमध्ये उमेदवार मिळाला नाही,” असा टोला पटोलेंनी लगावला आहे.त्याचबरोबर महाविकास आघाडी म्हणून या पाचही निवडणुका आम्ही जिंकू. या पद्धतीचे वातावरण संपूर्ण राज्यामध्ये आहे,” असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला आहे. तर शुभांगी पाटील यांनी आपण आपली विजयी मिरवणूक मातोश्रीच्या दरवाजापर्यंत घेऊन जाऊ असा विश्वास व्यक्त केला आहे.
सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने पक्ष त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस शिस्तपालन समितीने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसकडे केली होती. त्यानुसार कॉंग्रेसच्या शिस्तपालन समितीने सत्यजीत तांबे यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे नाशिकमधून आता शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.