Latest Marathi News

आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर मराठा समाजाचा हल्लाबोल

मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल, गाड्यांची जाळपोळ करत दगडफेक

बीड दि ३०(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाचा प्रश्न आता उग्र झाला आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत असतानाही, सरकार कोणतीही कार्यवाही करत नसल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. आता या आक्रमकतेचा फटला राज्यकर्त्यांना बसताना दिसत आहे. त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला करत जाळपोळ केल्याची घटना समोर आली आहे.

माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली आहे. एवढंच नव्हे तर आंदोलकांनी आमदार सोळंके यांच्या वाहनांना आगही लावली आहे. याबाबतचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झाले आणि याच्याच निषेधार्थ प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आंदोलकांनी दगडफेक केली आहे. एक मराठा आंदोलकाने आमदार प्रकाश सोळंके यांना फोन केला आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली. मुदतीचे 40 दिवस संपल्याची आठवण प्रकाश सोळंके यांना मराठा आंदोलकानं करुन दिली. त्यानंतर प्रकाश सोळंके म्हणाले की, ‘कोण म्हटलं सरकार आरक्षण देत नाही. ४० दिवस झाले म्हणून काय झालं? हे आरक्षण देऊन कोर्टात अडकवून ठेवायचं का परत? अशी आडमुठी भूमिका घेऊन चालत नाही, शासन देण्याचा प्रयत्न करत आहे. अशी भुमिका मांडली होती. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील टिप्पणी केली होती. या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने संतापलेल्या आंदोलकांनी आमदार सोळंके यांच्या घरावर तुफान दगडफेक केली. यामुळे सध्या माजलगावमध्ये तणाव निर्माण झाला आहे. सुदैवाने आमदार सोळंके आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य सुखरुप असल्याची माहिती आहे. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमध्ये घरासह गाड्यांचेही प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी वाचाळ नेत्यांना आवरावे. जर आमच्या वाटेला गेलात तर मराठे कोणालाही सोडणार नाहीत, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

हा हल्ला जेव्हा झाला तेव्हा मी माझ्या घरात होतो. सुदैवाने माझ्या कुटुंबातील कोणीही सदस्य किंवा कर्मचारी जखमी झाले नाहीत. आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. मीही मराठा समाजाचा आमदार आहे, माझाही मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा आहे. कोणीतरी अर्धवट क्लिप काढून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यावर मराठा समाजाने विश्वास ठेवू नये, आणि शांतता राखावी, असे आवाहन सोळंके यांनी केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!