‘मराठा समाज शिंदेंच्या अंगावर आला, तेव्हा अजितदादांना डेंगू झाला’
शिंदे गटाच्या नेत्याची अजित पवारांवर जोरदार टिका, शिंदे गट व अजित पवार गटात कुरघोडीचे राजकारण, महायुती तुटणार?
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- शिवसेना नेते रामदास कदम सध्या फारच चर्चेत आहेत. मध्यंतरी त्यांचा आणि खासदार गजानन कीर्तिकर यांच्यातील वाद चांगलाच रंगला होता. अखेर एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा पडला. पण आता रामदास कदम यांनी आता महायुतीतील घटक असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पंगा घेत जोरदार टिका केली आहे.
महाराष्ट्रात मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु केले होते. त्याला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला होता. पण मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धार तीव्र होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यू झाल्याचे समोर आले होते. पण आता रामदास कदम यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टिका केली आहे. मराठा समाज जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगावर आला, तेव्हा अजित पवारांना डेंग्यू झाला, अशी उपरोधिक टीका रामदास कदम यांनी केली आहे. ते म्हणाले “उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार शरद पवारांचे आशीर्वाद घ्यायला गेले, हे आपण समजू शकतो. पण काल दिलीप वळसे पाटीलही पवारांकडे आशीर्वाद घ्यायला गेले. सुनील तटकरेही आशीर्वाद घ्यायला गेले आणि तिथून ते अमित शाहांना भेटायला दिल्लीत गेले. मराठा समाज जेव्हा एकनाथ शिंदेंच्या अंगावर आला, तेव्हा नेमका अजितदादांना डेंग्यू झाला. अजित पवारांचे २० पैकी २० आमदार एकनाथ शिंदे आणि शासनाच्या विरोधात मंत्रालयात आंदोलन करू लागले. त्यांनी मंत्रालयाचं गेट बंद केलं, हेच मला कळत नाही.” असे म्हणत मराठा आरक्षणावरून सत्ताधारी पक्षातील अजित पवार गटाकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या प्रश्नावरून सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी केली होती. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यू झाल्याची बातमी समोर आली. अजित पवारांच्या या आजारपणाचे विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत. संजय राऊत यांनी देखील अजित पवार यांना राजकीय डेंगू झाला होता असा टोला लगावला होता तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील अजित पवार यांना ताप आहे की मनस्ताप असा प्रतिप्रश्न विचारत टोला लगावला होता. तर दुसरीकडे अजित पवार हे रामदास कदमांच्या आकलनाबाहेरचे नेते आहेत. त्यांनी जेवढं आकलन आहे, तेवढंच वक्तव्य करावं. नाहीतर डोळ्याला झंडूबाम लावून रडण्याची वेळ येते, असे प्रत्युत्तर सूरज चव्हाणांनी दिलं आहे.
खासदार गजानन कीर्तिकर आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. भाऊंना दिवाळीच्या शुभेच्छा देतो, शंभर टक्के वाद मिटला आहे, असे विधान कदम यांनी केला आहे. रामदास कदम आरोप करतात म्हणून मी प्रत्युत्तर देणार नाही. या प्रकरणावर माझ्याकडून पडदा टाकण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया कीर्तिकर यांनी दिली आहे.