Latest Marathi News
Ganesh J GIF

मराठा आंदोलनाला राज्यात हिंसक वळण, ‘या’ जिल्ह्यात संचारबंदी

आमदारांचे राजीनामा सत्र सुरूच, मनोज जरांगे पाटील यांचा महत्वाचा निर्णय, आरक्षणाचा तिढा सुटणार?

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- शांततेत सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यात सोमवारी एसटी बसेसवर दगडफेक, बस जाळणे, तहसीलदारांच्या गाडीवर हल्ले, जाळपोळ, घरांवर हल्ले, तोडफोड अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे आज बीड, धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करुन आठवडा झाला आहे. पण तरीही आरक्षणाचा निर्णय न झाल्याने मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. काल मराठवाड्यात सत्ताधारी आमदारांच्या घरावर दगडफेक, जाळपोळीचं सत्र सुरु आहे. याशिवाय तहसीलदारांची गाडी पेटवणं, शासकीय कार्यालयांची तोडफोड देखील केली जात आहे. त्यामुळे आमदार आणि खासदारांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे खासदार हेमंत पाटील यांच्यानंतर शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी राजीनामा दिला आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं त्यांनी पत्रामध्ये नमूद केलं आहे. शिंदे गटातून आमदारकीचा राजीनामा देणारे ते पहिलेच आमदार आहेत. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या ज्या १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सुरु आहे, त्या अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या आमदारांमध्ये बोरनारेंचा समावेश होतो. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहिरे यासुद्धा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एक दिवसीय उपोषणाला बसल्या आहेत. दुसरीकडे आंदोलक हिंसक वळणावर पोहोचले आहेत. त्यामुळे बीड आणि धाराशिवमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. इंटरनेट सेवा देखील बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बीड, धाराशिव, जालना व इतर जिल्ह्यांतील जवळपास ३ हजार बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचे शांततेत आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मराठा आंदोलकांनी आक्रमकाची भूमिका घेतली आहे. तसेच, राज्यात होणाऱ्या जाळपोळीला सरकार जबाबदार असल्याचे टीका जरांगे पाटलांनी केली आहे. त्याचबरोबर आमदार आणि खासदार यांनी राजीनामा न देता सरकसरवर दबाव टाकावा असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आंदोलन आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

मराठा आंदोलक हिंसक होत असल्याचे पाहून जरांगे पाटील यांनी मंगळवारी आपला निर्णय काहीसा बदलला आणि पाणी पिऊन उपोषण करण्याचे निश्चित केले आहे. त्यात आज मुंबईत सर्वपक्षीय मराठा आमदारांची बैठक होत आहे. त्यामुळे निर्णय होण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!