
पैसे आणि जातीवरून होणाऱ्या अपमानाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
प्रेमविवाह केलेल्या विवाहितेची आत्महत्या, सासरच्या त्या टोमण्याला वैतागलेल्या अमृताने का घेतला टोकाचा निर्णय?
सांगली- आधुनिक होण्याच्या कितीही गप्पा मारल्या तरीही समाजाची मानसिकता अजूनही बुरसटलेलीच आहे. याचाच दाखला देणारी घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे प्रेम विवाह केलेल्या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे वर्षभरापूर्वीच तिचे लग्न झाले होते.

अमृता ऋषिकेश गुरव असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. अमृता हिचा २४ डिसेंबर २०२४ रोजी ऋषिकेश याच्या सोबत प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीचे काही दिवस व्यवस्थित गेल्यानंतर सासरच्यांनी अमृताला जातीवरून अपमान करत होते. सततचा अपमान व माहेरातून दोन लाख रुपये आणण्याचा दबाव सहन न झाल्याने ही आत्महत्या केली आहे. लग्नानंतर काही महिन्यांत पती ऋषिकेश व सासरचे लोक हे सासू अनुपमा यांच्या आजारपणासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत यासाठी अमृता हिच्याकडे तगादा लावत होते. तिला मारहाण करून मानसिक छळ करीत होते. पती ऋषिकेश हा मारहाण करत होता. अमृता हिचा आईशी अधून मधून संवाद व्हायचा त्यावेळी सासूच्या कॅन्सर उपचारासाठी माहेरून २ लाख रुपये आणण्यासाठी मारहाण होत असल्याचे सांगत होती. तसेच सासरा अनिल हा तुला फुकट करून आणली आहे, तुझ्या बापाने आम्हाल लग्नात काही दिले नाही, तु आमच्या जातीची नाहीस असे टोमणे मारत होता. सासू अनुपमा, नणंद ऋतुजा वारंवार अपमान करीत होते. मामा नंदकिशोर हा, ऋषिकेश याला, तू अमृताला सोडून दे, तुझं आपल्या जातीतील मुलीशी लग्न लावू, म्हणून अमृता हिला मानसिक त्रास देत होता. सततच्या त्रासाला कंटाळून अमृता हिने शुक्रवारी सायंकाळी विषारी द्रव प्राशन केले. त्यानंतर तिला इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्रकार समजताच आई-वडिलांनी रुग्णालयात धाव घेतली. तिथे तिने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. तिची प्रकृती बिघडल्याने तिला कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल केले. पण तेथे रविवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अमृता हिने घरच्यांच्या विरोधात जाऊन ऋषिकेश याच्याशी प्रेमविवाह केला होता. पण अखेर त्यातच तिचा दुर्दैवी अंत झाला.

पती ऋषिकेश अनिल गुरव, सासू अनुपमा अनिल गुरव, सासरा अनिल मधुकर गुरव, नणंद ऋतुजा अनिल गुरव, मामा नंदकिशोर पांडुरंग गुरव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अमृता हिची आई वंदना कोले यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.


