
धक्कादायक! विवाहित प्रेमीयुगलाने विष प्राशन करत संपवले आयुष्य
पळून जात केले होते लग्न, घरच्यांनी हा निर्णय घेतल्याने केली आत्महत्या, पुण्याहून गावी आल्यानंतर काय घडले?
नांदेड – नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. वर्षभरापूर्वी पळून गेलेल्या एका विवाहित प्रेमीयुगुलाने गावी परतत विष प्राशन करून आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. विशेष म्हणजे दोघे विवाहित असतानाही त्यांनी पळून जाऊन लग्न केले होते.

हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथे सोमवारी ही घटना घडली. गजानन केरबा गव्हाळे आणि उमा बालाजी कपाटे असं जीव दिलेल्या प्रेमीयुगुलाची नावं आहेत. घरी परतल्यानंतर कुटुंबाने या दोघांनाही स्वीकारण्यास नकार दिल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथील गजानन केरबा गव्हाळे खाजगी वाहनांवर चालक म्हणून काम करायचा. त्याचं लग्न झालेलं असून पत्नीपासून तीन अपत्ये आहेत. वर्षभरापूर्वी गावातील विवाहित उमा बालाजी कपाटे हिच्यासोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले. उमालाही तीन मुलं आहेत. दोघेही एकाच समाजातील असून, जुळलेल्या संबंधातून त्यांनी आपल्या कुटुंबाला सोडून एक वर्ष बाहेर पुणे येथे राहिले होते. त्यानंतर ते गावात आले, पण दोघांना स्वीकारण्यास घरच्यांनी विरोध केला. त्यामुळे या प्रेमीयुगुलाने गावालगत असलेल्या शेतात जाऊन विष प्राशन केले. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी दोघांना उपचारासाठी हदगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथुन त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, सोमवारी दोघांचाही उपचारा दरम्यान मुत्यू झाला.

याप्रकरणी मनाठा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विलास चवळी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार अशोक दाडे तपास करीत आहेत. या घटनेनंतर उमा आणि गजानन या दोघांची मुले आई आणि वडिलांविना पोरकी झाली आहेत, तसेच या घटनेची चर्चा होत आहे.


