‘मशाल’ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचीच
उच्च न्यायालयाचा उद्धव ठाकरेंना दिलासा, शिंदे गटाची वाढवली चिंता
मुंबई दि १९(प्रतिनिधी)- शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाले होते. मात्र, या मशाल चिन्हावर समता पक्षाने आक्षेप घेत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने ती फेटाळून लावल्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. मशाल हे चिन्ह ठाकरे गटाकडेच राहणार आहे.
समता पक्षाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे स्पष्ट केले की, समता पक्षाची मान्यता २००४ मध्ये संपुष्टात आल्यापासून समता पक्षा चिन्हावर अधिकार सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे. समता पक्षाची स्थापना १९९४ मध्ये जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश कुमार यांनी केली होती.पण २००४ नंतर हा पक्ष अस्तिवात नाही. शिवसेनेतील फुटीनंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाला मशाल या चिन्हाचा वापर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. पण समता पक्षाने मशाल चिन्हामध्ये साम्य असल्याने मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मशाल चिन्ह इतरांना न देण्याची विनंती केली होती.पण पक्षाची मान्यता रद्द झाल्याने समता पक्षाची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाच्या चिन्हावर देखील आक्षेप घेण्यात आला आहे.
जॉर्ज फर्नांडिस यांनी १९९४ मध्ये समता पार्टीची स्थापना केली होती. त्यानंतर १९९६ मध्ये निवडणूक आयोगाने ”धगधगती मशाल” हे चिन्ह दिले होते. तर आता हे चिन्ह उद्धव ठाकरेंना देण्यात आले आहे.तर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आले आहे.