अंधेरीच्या पोटनिवडणूकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल धगधगली
ऋतुजा लटके यांचा दणदणीत विजय, नोटाला मिळाली 'इतकी' मते
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन महिन्यांपासून निवडणुकीने राजकारण तापले होते त्या अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पण दुसऱ्या क्रमांकावर नोटाला मते मिळाल्याने शिवसेनेचा भाजपावरचा आरोप खरा ठरला आहे.

अंधेरी पुर्वची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासूनच राजकारण जोरात सुरु होते. आज निकालाअंती ऋतुजा लटके यांना ५५ हजार ९४६ मतं मिळाली आहेत. तर नोटाला १० हजार ९०६ मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे पक्षफुटीनंतर शिवसेनेचा हा सर्वात मोठा विजय आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूकीत ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढणार आहे. सुरूवातीला भाजपाकडून या ठिकाणी मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती पण नंतर ती मागे घेण्यात आली तर लटकेंच्या राजीनाम्यावर देखील बरेच राजकारण रंगले होते पण अखेर न्यायालयाच्या निकालानंतर लटकेंच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला होता. पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार असता तर ही निवडणूक अटीतटीची ठरली असती पण लटकेंनी निर्भेळ यश मिळवले आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या काही दिवस आधी मतदारसंघात नोटाला मतदान करा, असा प्रचार सुरु झाला होता. या प्रचाराचे परिणाम आजच्या निकालात पाहायला मिळत आहेत. पण या नकारात्मक प्रचाराला झुगारत लटके यांनी मोठा विजय मिळवला आहे. मशाल चिन्हावर ठाकरे गटाचा हा पहिलाच विजय ठरला आहे.
या विजयानंतर भाजपाने आपला उमेदवार मागे घेतला, पण नोटाला मतदान करा, असा प्रचार त्यांनी केला, असा आरोप अनिल परब यांनी केला. तत्पूर्वी या विजयानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनाबाहेर जमा होता विजयाचे सेलिब्रेशन केले आहे. हा विजय उद्धव ठाकरेंना महापालिका निवडणूकीसाठी बुस्ट देणारा ठरणार आहे.