तर नांदेडकर आणि लातूरकर फडणवीसांच्या मांडीवर बसायला तयार
सत्तासंघर्षावर या नेत्याचा मोठा दावा, शिंदे गटावरही वक्तव्य
नांदेड दि ६(प्रतिनिधी)- शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसच्या आमदार फुटीबाबत केलेले वक्तव्य शांत होत नाही तोवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक नवा दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून राज्यात मध्यावधी होणार की आमदारांची पळवापळवी होणार या चर्चांना उधान आले आहे.
नांदेडमधील धम्म मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे गट, भाजप आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. सध्याच्या सरकारमधले १६ आमदार अपात्र ठरले तर नांदेडकर आणि लातूरकर फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसायला तयार आहेत, असं मोठं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. यावेळी त्यांचा रोख अशोक चव्हाणांसह अमित आणि धीरज देशमुखांनावर होता. तसेच यावेळी आंबेडकर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली. राहुल गांधींचा उपक्रम चांगलाय, मात्र यातून फार काही हाती लागेल, अशी शक्यता कमी असल्याचे ते म्हणाले शिवाय काँग्रेसमधील नितीमत्ता संपली असल्याचा आरोप देखील आंबेडकर यांनी केला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात मोठी उलधापालथ घडणार असल्याचे संकेत आंबेडकर यांनी दिले आहेत.

मध्यंतरी अशोक चव्हाण यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर चव्हाण हे १२ आमदारांना घडून भाजपात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. नेतृत्वाकडून डावलले जात असल्याची भावना काँग्रेसमध्ये अनेक नेत्यांमध्ये आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याही मनात ही भावना असल्याचे सांगण्यात येते आहे. त्यामुळे आगामी काळात मोठे राजकीय नाट्य होण्याची शक्यता आहे.