मनसे नेते संदीप देशपांडेंवर शिवाजी पार्कमध्ये प्राणघातक हल्ला
राज ठाकरेंसह मनसे नेते देशपांडे यांच्या भेटीला, मुंबई महापालिकेतील आरोपामुळे हल्ला?
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राज ठाकरेंचे विश्वासू मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकवेळी क्रिकेटच्या स्टम्प्सने हल्ला करण्यात आला. राजकीय वैमन्यस्यातून हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी शिवाजी पार्क परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना हल्ला झाला. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांच्या हात आणि पायाला दुखापत झाली आहे. संदीप देशपांडे यांच्यावर सध्या हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात आले.देशपांडे यांच्यावरील हल्ल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. यानंतर संदीप देशपांडे यांना भेटण्यासाठी मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी हिंदुजा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. राज ठाकरे यांच्यासह त्यांचे पुत्र आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे, तसेच, बाळा नांदगावकर यांनी हिंदुजा रूग्णालयात जात संदीप देशपांडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. देशपांडे यांच्यावरील हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान या हल्ल्यामागे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचा हात असल्याचा संशय मनसेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करुन संदीप देशपांडे यांना डिस्चार्ज दिला आहे. संदीप देशपांडे हे व्हीलचेअरवर बसून रुग्णालयाबाहेर आले. त्यानंतर राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीत बसून ते घराकडे रवाना झाले. देशपांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार, हे पाहावे लागेल. मनसेकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. पोलिसांनी दोषींना ताबडतोब अटक करावी आणि शासन करावे. अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.