Latest Marathi News
Ganesh J GIF

समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर मनसेचे खळखट्याक

टोलनाक्याच्या तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, टोलमुद्दा पुन्हा गाजणार?

नाशिक दि २३(प्रतिनिधी)- राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि टोलनाका यांच्यात असलेला ३६ चा आकडा संपुर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. मनसेने टोलनाक्यांच्या विरोधात केलेली आंदोलने चांगलीच गाजली होती. पण आता मनसेने आपला मोर्चा नव्यानेच सुरु झालेल्या समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यांकडे वळवली आहे. याला कारण ठरले आहेत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा टोलप्रश्न चर्चेत आला आहे.

अमित ठाकरे काल उत्तर महाराष्ट्राच्या दाै-यावर होते. आपला दाैरा संपवून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. यावेळी सिन्नर तालुक्यातील समृद्धी महार्मावरील टोलनाक्यावर त्यांची गाडी अडवून टोल कर्मचाऱ्याने त्यांच्या चालकांशी वाद घातल्याची चर्चा होऊ लागली होती. ही चर्चा मनसे कार्यकर्त्यांच्या कानावर येताच संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा केंद्रबिंदू असलेल्या गोंदे टोलनाक्याची तोडफोड केली आहे. नाशिक मधील मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्या नेतृत्वात रात्री अडीच वाजेच्या सुमारास मनसे कार्यकर्त्यांनी सिन्नर तालुक्यातील गोंदे या ठिकाणी असलेल्या समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर धडक देत तो टोल नाका संपूर्णतः उध्वस्त केला आहे. मनसेचे अचानक केलेल्या या खळखट्याक मुळे टोल प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडालेली होती. या तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे मनसेचा आवडता टोलमुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी येणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील टोल नाक्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रणशिंग फुंकले होते. प्रदीर्घकाळ चाललेल्या या आंदोलनावेळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी टोलनाके फोडण्याचे प्रकार घडले होते. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून समृद्धी महामार्गाकडे बघितले जाते. त्यामुळे आगामी काळात हा मुद्दा कोणते वळण घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!