
जनतेच्या मनात मोदींची प्रतिमा कुटुंबप्रमुखाची
उद्धव ठाकरेंकडे ना अजेंडा, ना व्हिजन, महाराष्ट्रापेक्षा त्यांना कुटुंबाची चिंता अधिक
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कर्तृत्व संपूर्ण देशाने मान्य केले आहे. जनतेच्या मनात पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल कुटुंबप्रमुख ही भावना आहे व ते देखील जनतेला आपल्या कुटुंबाप्रमाणे मानतात. हेच शिल्लक सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे दुखणे आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ‘माझं कुटुंब- माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना ते कळणार नाही. असेही ते म्हणाले आहेत.
ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते. बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली, ते म्हणाले, हिंदुत्वाचा वारसा मिळूनही उद्धव ठाकरे यांना ‘इंडी’ आघाडीचे गोडवे गावे लागत आहेत. त्यांनी शिवतीर्थावर काँग्रेस धार्जिणी भूमिका घेत पुन्हा एकदा हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनबद्दल बोलतील, असे वाटले होते, पण ते मूग गिळून गप्प बसले. कंत्राटीभरती सुरू केल्याबद्दल महाराष्ट्रातील तरुणांची माफी मागतील, अशी आशा होती, परंतु, त्यांना महाराष्ट्रातील तरुणांपेक्षा स्वतःच्या मुलाच्या भविष्याची चिंता जास्त आहे. महाराष्ट्राची जनता त्यांना सोडणार नाही. उद्धव ठाकरे यांच्याजवळ विकासाचा अजेंडा आणि विकासाचे व्हिजनही नाही. त्यांना कॉंग्रेस आणि शरद पवारांची वकिली करावी लागत आहे. शरद पवारांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ते आणखीच बिघडले आहे, असाही टोला त्यांनी लगावला. मराठा आरक्षण देण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले होते. ते उद्धव ठाकरेंनी घालविले. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी थोडी वाट पाहावी.
पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत. त्या पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीतील पदाधिकारी आहेत. त्यांच्या निवडणुकीबद्दलचा निर्णय केंद्रीय पार्लियामेंट्री बोर्ड घेईल. त्यांच्या पाठिशी भाजपा पूर्ण ताकदीने उभी आहे. भाजपाचा राज्यात विस्तार करण्यासाठी त्या मदत करतील असाही विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.