मान्सून आला पण एल- निनो सक्रिय झाल्याने दुष्काळाची भीती
शेतकऱ्यांची चिंता वाढली, एल- निनो चक्रीवादळामुळे सक्रिय, या काळात पाऊस ओढ लावणार
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- देशात मान्सुनचे आगमन झाले असले तरीही तो मनासारखा बरसत नाही. बिपरजाॅय चक्रीवादळामुळे यंदा मान्सून १६ जुननंतर येण्याची शक्यता आहे. पण आता चिंतेत भर टाकणारी एक बातमी समोर आली आहे. एल निनो सक्रिय झाल्याने मान्सूनच्या आगमनाबरोबर दुष्काळाचेही सावट देखील पडले आहे. अमेरिकेच्या नोआ संस्थेने ही माहिती दिली आहे.
यंदा एल निनोमुळे पाऊस कमी पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. एल-निनो च्या प्रभावामुळे भारतीय पावसाला मोठा फटका बसतो. तर दर ३-६ वर्षांनी हा एल निनोचा प्रभाव पडत असल्याने त्या-त्या वर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस होतो. एल-निनोने २०१८ साली भारतात हजेरी लावली होती. त्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. तर त्याआधीही २००२ साली सरासरीपेक्षा १९ टक्के कमी पाऊस झाला होता. तर २००४ साली सरासरीपेक्षा १३ टक्के कमी पाऊस झाला होता.२००९ साली सरासरीपेक्षा २३ टक्के कमी पाऊस झाला होता. २०१४ सालीही सरासरीपेक्षा १२ टक्के कमी पाऊस झाला होता. तर २०१५ सालीही सरासरीच्या १४ टक्के कमी पाऊस झाला होता. आता यंदाही १५ जुलै किंवा १ ऑगस्टनंतर पावसाला ओढ बसण्याची शक्यता आहे. दुष्काळाचे सावट, पाणी टंचाई, नापिकी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून लवकरच दाखल होईल. पण यंदा राज्यात एकूण सरासरीच्या ९५ टक्के पाऊस होईल. तसेच जून आणि जुलै या दोन महिन्यांत कमी पाऊस तर ऑगस्ट महिन्यात साधारण पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
‘एल निनो’ ही नैसर्गिक घटना असून सरासरी दर दोन ते सात वर्षांनी येते. त्यांच्या प्रभावामुळे जगभरात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी दुष्काळाचा धोका वाढतो. त्यामुळे पावसावर अवलंबून असणाऱ्या खरीप आणि रबी पिकांच्या उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यताही यामुळे नाकारता येत नाही. मे अखेरपासून प्रशांत महासागराच्या सर्वच भागांचं तापमान हे ०.५ अशांनी वाढले आहे.