
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने मराठा समाजासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ आणि जलद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

६२ महसूल मंडळांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन

नागरिकांना जुन्या नोंदी शोधण्यासाठी किंवा कागदपत्रांसाठी शासकीय कार्यालयांचे खेटे मारावे लागू नयेत, यासाठी जालना जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील तब्बल ६२ महसूल मंडळांमध्ये १६ सप्टेंबरपर्यंत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांच्या माध्यमातून कुणबी नोंदींचा शोध घेतला जाणार आहे.

तक्रार निवारणासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती
प्रकरणांचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी उपजिल्हाधिकारी शिरीष यादव यांची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नोडल अधिकाऱ्यांची मुख्य जबाबदारी:
प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा दररोज आढावा घेणे.
तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमध्ये समन्वय साधणे.
प्रलंबित अर्जांचा जलद गतीने निपटारा करणे.
महत्त्वाची टीप: या मोहिमेसंदर्भात किंवा तक्रारींसाठी प्रशासनाकडून ९५४५४५१००५ हा विशेष संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मराठा विद्यार्थ्यांसाठी ‘सारथी’ योजनेत मोठा बदल
मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठीही एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. ‘सारथी’ (SARTHI) संस्थेमार्फत दिली जाणारी परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती अधिक सुलभ करण्यात आली आहे.शिष्यवृत्तीच्या लाभांवरील रकमेची कमाल मर्यादा आता संपुष्टात आणली आहे.शैक्षणिक संस्थेचे संपूर्ण शुल्क आता संबंधित यंत्रणेकडून थेट परदेशी शैक्षणिक संस्थेला (युनिव्हर्सिटीला) अदा केले जाईल. यामुळे परदेशात शिकणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
आंदोलनाची धग मुंबईपर्यंत पोहोचणार?
दुसरीकडे, मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन मुंबईत नेण्याचा इशारा मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे. जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी मुंबई पोलिसांना (आझाद मैदान पोलीस ठाणे) यासंदर्भात पुन्हा एक नवीन पत्र दिले आहे. अंतरवाली सराटीतील उपोषण सुरू असतानाच, मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत धडक देणार असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. मुंबईतील आंदोलनाची निश्चित तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

