
‘या’ कारणांमुळे नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्ष पद जाणार?
अध्यक्षपदासाठी या नेत्यांची नावे चर्चेत, बघा कोण होणार नवा प्रदेशाध्यक्ष...
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- सत्यजित तांबे यांच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात सुरु झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. आता काँग्रेस हाय कमांडने याची दखल घेतली आहे. त्यामुळे आता घडामोडींना वेग आला असून नाना पटोलेंची प्रदेशाध्यक्ष पदावरून गच्छंती होण्याची शक्यता आहे.
तांबे यांच्या बंडखोरीनंतर नाना पटोले यांनी सत्यजित व त्यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. नगरमधील काँग्रेस तसेच भाजप कार्यकर्त्यांनी सत्यजित यांचा प्रचार केला होता. त्यावेळी थोरात समर्थक पदाधिकाऱ्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. त्याचबरोबर विजय वडेट्टीवार, आशिष देशमुख, सुनील केदार यांनी पटोलेंवर नाराजी व्यक्त केली आहे. बाळासाहेब थोरातांच्या तक्रारीची गंभीर दखल आता हायकमांडने घेतल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी देखील महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील आणि प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांच्यासमोर काँग्रेसच्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचत कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे नाना पटोलेंचा पत्ता कट करत नवा प्रदेशाध्यक्ष नेमला जाण्याची शक्यता आहे. नवीन प्रदेशाध्यक्ष पदासाठी अशोक चव्हाण, आशिष देशमुख, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांची नावे चर्चेत आहेत. दरम्यान नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा सुद्धा त्यांच्यावरील नाराजीचे कारण बनला आहे.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाबरोबरच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना देखील अध्यक्षपदावरून काढण्याची शक्यता आहे. सध्या तरी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे देखील अस्पष्ट आहे. एकंदरीत महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पोट निवडणूक संपल्यानंतर म्हणजे मार्चमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.