नाना पटोले यांनी घेतली मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट
शरद पवारांच्या संभ्रमतेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी, राजकीय परिस्थितीवर खल?
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थिती आणि इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत इंडिया आघाडीची बैठक आहे. या बैठकीच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा झाली. राज्यातील राजकीय परिस्थितीवरही सविस्तर चर्चा झाली. शरद पवारांबद्दल जो गैरसमज पसरवला जात आहे त्यावरही चर्चा झाली. शरद पवार आणि अजित पवार यांची बैठक झाल्याच्या बातम्या येत आहेत. यामुळे जनतेमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये. महाविकास आघाडी एकत्र आहे त्यामुळे लोक आमच्याकडे एकत्र बघतात कोणताही संभ्रम होऊ नये अशी आमची धारणा आहे. त्यामुळे या विषयांवर लवकर भूमिका स्पष्ट झाली पाहिजे. १५ ऑगस्ट आला तरी पूर्णवेळ पालकमंत्र्यांचा पत्ता नाही. सध्या राज्यात काही भागात अतिवृष्टी आणि काही भागात पाऊस नसल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. ठाण्याच्या रुग्णालयात १२ तासात १७ निष्पाप नागरिकांचा जीव गेला. राज्याची आरोग्यव्यवस्थाच आजारी आहे. हे सरकारी गलथानपणाचे बळी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरातील ही अवस्था आहे, इतर भागात काय परिस्थिती असेल याची आपण कल्पना करू शकतो. सरकारला या निष्पाप लोकांच्या मृत्यूची जबाबदारी घ्यावी लागेल. या प्रकरणात राज्यशासन दोषी आहे अशी जनतेची भावना आहे. अशी टिका पटोले यांनी केली आहे.
रोज बदल्या करणे अधिकाऱ्यांना अस्थिर ठेवणे एवढेच काम हे सरकार करत आहे. या सरकारने पोलिसांवर दबाव टाकून पोलिसांचा राजकीय वापर चालवला आहे त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा खराब झाली आहे असे पटोले म्हणाले आहेत.