चंद्रकांत पाटलांच्या स्वागताला वाजले राष्ट्रवादीचे गाणे
पुण्यात चर्चांना उधाण, पोलिसांनी डीजेवाल्यालाच घेतले ताब्यात
पुणे दि २८(प्रतिनिधी)- राज्यात आणि विशेष करुन पुण्यात राष्ट्रवादी विरूद्ध भाजपा हा सामना कायम पहायला मिळतो पण याच पुण्यात एक अनोखी घटना घडल्याने उलटसुलट चर्चांना उधान आले आहे. भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वागताला चक्क ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हे गीत वाजवण्यात आल्याने चर्चांना उधान आले आहे तर पोलीसांनी डीजेवाल्याला ताब्यात घेतले आहे.
दिवाळीनिमित्त पुण्यातील रास्ता पेठेत भाजपा पदाधिकाऱ्याने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली. पण चंद्रकांत पाटील कार्यक्रमात येताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हे प्रचार गीत वाजविण्यात आले, त्यामुळे एकच गोंधळ उडाला सोबत वेगवेगळ्या चर्चेची खसखस पिकली. हा पदाधिकारी कोण होता याची माहिती मिळू शकली नाही पण भाजपच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रचारगीत वाजविण्यात आल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

पुणे पोलिसांनी डीजे चालकाला ताब्यात घेतले आहे. साऊंउ सिस्टीम विनापरवाना लावण्यात आली होती, असे कारण देत डीजे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कार्यक्रम आयोजित करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्याला पक्षाकडून काय कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.