
निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती!; दिल्लीत चालत्या स्लीपर बसमध्ये ११ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार
राजधानी दिल्लीत १४ वर्षांपूर्वी घडलेल्या काळ्या-कुट्ट ‘निर्भया’ प्रकरणाच्या भीषण आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. ग्रेटर नोएडा ते कश्मीरी गेट दरम्यान एका चालत्या स्लीपर बसमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर बसचा चालक आणि कंडक्टरने सामूहिक बलात्कार केल्याची अत्यंत संतापजनक आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. कश्मीरी गेट पोलिसांनी तत्परता दाखवत दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून, गुन्हा घडलेली स्लीपर बस जप्त केली आहे.

आई रागावल्यामुळे सोडले होते घर

पीडित अल्पवयीन मुलगी मूळची उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील असून, ती सध्या ११ वीमध्ये शिकत आहे. अभ्यासावरून आई रागावल्याने ती घरातून निघून नोएडा सेक्टर-६३ येथे राहणाऱ्या आपल्या चुलत भावाकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र, नोएडामध्ये मुसळधार पाऊस आणि अंधार असल्यामुळे ती चुकून परी चौक येथे उतरली.

एकटी मुलगी, रिकामी बस अन् नराधमांचा कट
परी चौक येथे एक स्लीपर बस थांबवून तिने सेक्टर-६३ ला जाते का, अशी चौकशी केली. बसमध्ये एकही प्रवासी नसताना कंडक्टरने ‘हो’ सांगून तिला आत बसवले. ही बस दुरुस्तीनंतर ग्रेटर नोएडातील वर्कशॉपमधून उत्तर दिल्लीतील तिमारपूर पार्किंगकडे परतत होती. चालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप यांनी बसमध्ये मुलगी एकटी असल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार करण्याचा कट रचला.
४७ किलोमीटरच्या प्रवासात क्रूरतेचा कळस
परी चौक ते कश्मीरी गेट या तब्बल ४७ किलोमीटरच्या प्रवासादरम्यान चालक आणि कंडक्टर दोघांनी चालत्या बसमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिने प्रतिकार केला असता तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. उशिरा रात्री दिल्लीत पोहोचल्यानंतर आरोपींनी मुलीला कश्मीरी गेट बस स्थानकाजवळील रिंग रोडवर सोडून पळ काढला आणि पार्किंगमध्ये जाऊन आरामात झोपले.
पडदे लावलेली बस अन् सुरक्षेचा फज्जा
बसच्या खिडक्यांवर जाड पडदे लावलेले असल्याने आत काय चालले आहे हे बाहेरून दिसत नव्हते. एवढ्या लांबच्या प्रवासात एकाही पोलिसांच्या नाकेबंदीवर किंवा चेकपोस्टवर बसची तपासणी झाली नाही. २०१२ च्या निर्भया कांडानंतर ठरवलेले सुरक्षेचे कडक नियम आजही फक्त कागदावरच असल्याचे या घटनेने पुन्हा सिद्ध केले आहे.
सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींना बेड्या; डीएनए चाचणी होणार
कश्मीरी गेट पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्कार, अपहरण व मारहाणीचा एफआयआर (FIR) नोंदवला. एसीपी शंकर बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तिमारपूर पार्किंगमधून आरोपी कुलदीप आणि संदीपच्या मुसक्या आवळल्या.फॉरेन्सिक टीमने बसमधून जैविक पुरावे गोळा केले असून आरोपींचे आणि पीडितेचे डीएनए मॅचिंग केले जाणार आहे, जेणेकरून न्यायालयात भक्कम पुरावे सादर करता येतील.

