ठाकरेंची नाही तर खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच?
'हा' फैसला शिंदे गटाच्या बाजूने, ठाकरेंना जोरदार धक्का
कल्याण दि २२(प्रतिनिधी)- कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेकडून साजरा होणारा नवरात्र उत्सव यंदा शिंदे गटामुळे वादात सापडला होता. दोन्ही गटांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नवरात्र उत्सवासाठी परवानगी मागितली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना परवानगी दिली आहे. यावर उद्धव ठाकरे गटाने नाराजी व्यक्त करत कायदेशीर लढाईचा इशारा दिला आहे.
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर गेली ५४ वर्षांपासून नवरात्र उत्सव साजरा होत आहे. मात्र यंदा या उत्सवावर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटातील वादामुळे तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पूजेसाठी दोन्ही गटांनी जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी शिंदे गटातील विश्वनाथ भोईर यांना किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे किल्ले दुर्गाडीवर यंदाचा म्हणजेच ५५ वा नवरात्र उत्सव शिंदे गटातील शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली साजरा होणार आहे. उद्धव ठाकरे गटातील कल्याण शहर प्रमुख सचिन बासरे यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे दसरा मेळाव्याबरोबर नवरात्र उत्सवही ठाकरेंच्या हातातून गेला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी ठाकरेंना एकामागे एक धक्के देण्यास सुरूवात केली आहे. आमदार, पदाधिकारी यांच्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या भावनिक मुद्दयाला हात घालण्यास सुरुवात केली आहे. पण सध्या तरी शिंदे ठाकरेंवर वरचढ ठरले आहेत. यामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत.