Latest Marathi News
Ganesh J GIF

आता थेट विलीनीकरण? विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी शिंदेंची कडक अट; ‘त्या’ बड्या नेत्याची पक्षात एन्ट्री निश्चित?

विधान परिषदेमधील 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही उमेदवारी कोणाला दिली जाणार याबाबत चर्चा सुरू आहेत.याचदरम्यान आता शिंदे यांच्या शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. परंतु बच्चू कडू यांना विधान परिषदेवर संधी द्यायची असेल, तर त्यांना आपला ‘प्रहार जनशक्ती पक्ष’ अधिकृतपणे शिवसेनेत विलीन करावा लागेल, अशी अट घालण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्यात गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे, ज्यामध्ये या राजकीय समीकरणावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार बच्चू कडू आज मंगळवारी पुन्हा प्रहार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या नेत्यांसोबत बच्चू कडू यांची महत्वाची बैठक होणार आहे. तत्पूर्वी, बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षानेही शिवसेनेकडे काही भूमिका मांडल्याची माहिती आहे. बच्चू कडू यांना विधानपरिषदेसह राज्यात मंत्रिपद मिळावं, अशी इच्छा प्रहार पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेत्यांना सांगितली आहे. यानंतर आता प्रहार पक्षाचे नेते आणि शिवसेना नेत्यांमध्ये काय निर्णय होणार, हे पाहावे लागेल.

विदर्भात शिंदेंची ताकद वाढणार? जर बच्चू कडू यांनी ही अट मान्य केली आणि ते शिवसेनेत सहभागी झाले, तर विदर्भात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक आक्रमक चेहरा आणि मोठी ताकद मिळणार आहे. प्रहारची ताकद ही तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये असल्याने शिवसेनेचा विस्तार होण्यास मदत होणार असल्याचेही म्हटले जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!