Latest Marathi News
Ganesh J GIF

“आता तुकडा पडल्याशिवाय राहणार नाही!”; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला २८ ऑगस्टचा अल्टिमेटम

“मराठ्यांना वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून समाजाच्या लेकरांसाठी रक्त जळत आहे. त्यामुळे आता एकानेही घरी थांबायचं नाही,” असा थेट इशारा देत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात शंखध्वनी केला आहे. येत्या २९ ऑगस्ट रोजी मराठा आंदोलनाला ३ वर्षे पूर्ण होत असून, याच दिवसापासून पुन्हा एकदा शेवटचे आणि सर्वात मोठे ‘निर्णायक आंदोलन’ करण्याची मोठी घोषणा जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून केली आहे.

सरकारला २८ ऑगस्टचा अल्टिमेटम; हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्राची मागणी

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट शब्दांत इशारा देत आरक्षणाबाबत अंतिम मुदत दिली आहे. सरकारने येत्या २८ ऑगस्टपर्यंत हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला प्रमाणपत्रांचे वाटप करावे, असा कडक अल्टिमेटम त्यांनी दिला आहे. “जर तुम्ही हैदराबाद गॅझेट स्वीकारले आहे, तर मग त्यानुसार प्रमाणपत्रे का दिली जात नाहीत? आधी तुम्ही स्थानिक चौकशी अहवाल आणला, मग आता मराठ्यांना टार्गेट कशामुळे करताय?” असा संतप्त सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे. “आता तुकडा पडल्याशिवाय राहणार नाही. हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता मराठा समाज थांबणार नाही,” अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.

५८ लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांसाठी ‘आरपारची लढाई’

जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, हे आंदोलन समाजातील मुलांच्या भविष्यासाठी असून ते आता मागे हटणार नाहीत. “कधी काळी मराठा समाज एवढा मोठा एकवटला नव्हता, त्यामुळे आपल्याला आता अत्यंत काळजीपूर्वक पुढे जायचे आहे. जर कोणी आपल्याला येड्यात काढत असेल, म्हणूनच मी तुम्हाला आज बोलावले आहे,” असे ते म्हणाले.

सरकार सापडलेल्या ५८ लाख कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र देत नाही, म्हणूनच हे एकदम मोठे आणि निर्णायक आंदोलन करावे लागत आहे. ५८ लाख नोंदींचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता सरकारला सोडायचे नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.ज्यांना माहिती आहे की आपल्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांनी अजिबात वेळ न घालवता तात्काळ प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

“सर्वपक्षीय नेत्यांच्या मुलांनाही आरक्षणाचा फायदा होणार”

मनोज जरांगे यांनी मराठा समाजातील नागरिकांना आणि तरुणांना २९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आंदोलनासाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. “२९ ऑगस्टपासून जोपर्यंत हे आंदोलन चालणार आहे, तोपर्यंत सर्वांनी समाजासाठी वेळ द्यावा. हे आरक्षण केवळ सर्वसामान्य मराठ्यांसाठी नाही, तर सर्वपक्षीय नेत्यांच्या मुलांनाही या आरक्षणाचा फायदा होणार आहे,” असे सांगत त्यांनी सर्वांना या लढ्यात सामील होण्याचे आवाहन केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!