
पुण्यातील व्यावसायिक तरुण केतन अग्रवाल खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या नावाची चर्चा देशभरात सुरू असतानाच, आता पुणे जिल्ह्यातून ‘सिया’ नावाच्याच एका कथित महिलेकडून कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत चक्क एका पोलीस पाटलाची तब्बल ५६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या नव्या ‘सिया’च्या कारनाम्यामुळे पुणे जिल्ह्यात प्रचंड खळबळ माजली आहे.

नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान फसवणूक; १० कोटींचा बनावट नफा दाखवला!

मुळशी तालुक्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस पाटलाने या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत आरोपींनी वेगवेगळ्या कारणांनी तक्रारदाराकडून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम गुंतवून घेतली. तक्रारदाराने जसजशी अधिक गुंतवणूक केली, तसतसे संबंधित बनावट ट्रेडिंग ॲपच्या डॅशबोर्डवर त्यांच्या पोर्टफोलिओचे मूल्य तब्बल १० कोटी रुपये झाल्याचे दाखवण्यात आले. इतकी मोठी रक्कम खात्यावर दिसत असल्याने तक्रारदाराने जेव्हा पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना प्रत्यक्षात कोणतीही रक्कम मिळाली नाही आणि त्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले.

सोशल मीडियावरील जाहिरात आणि ‘सिया’ची एन्ट्री
या संपूर्ण फसवणुकीची सुरुवात सोशल मीडियावरील एका आकर्षक जाहिरातीपासून झाली होती. एका नामांकित ब्रोकरेज कंपनीच्या नावाने शेअर बाजारात कमी जोखमीमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन या जाहिरातीत होते. तक्रारदाराने जाहिरातीवर क्लिक करताच, त्यांना एका गुंतवणूकविषयक व्हाट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले. या ग्रुपमध्ये शेअर बाजार, आयपीओ आणि ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवण्याबाबत सतत खोट्या पोस्ट केल्या जात होत्या. त्यानंतर ‘सिया’ नावाच्या एका कथित महिलेने तक्रारदाराशी संपर्क साधला. तिने स्वतः शेअर बाजारातील तज्ज्ञ असल्याचे सांगत गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले. तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी सुरुवातीला एका बनावट ट्रेडिंग ॲपचा वापर केला, ज्यामध्ये सुरुवातीला काही रक्कम गुंतवल्यानंतर मोठा नफा झाल्याचे खोटे चित्र दाखवण्यात आले. त्यानंतर सवलतीच्या दरात आयपीओ शेअर्स आणि विशेष गुंतवणूक योजनांचे आमिष दाखवून ५६ लाख रुपये जमा करून घेण्यात आले.
पैसे काढण्यासाठी पुन्हा मागितले ३० लाख!
जेव्हा पोलीस पाटलांनी ॲपमध्ये दिसणारे १० कोटी रुपये काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी नवीन खेळी खेळली. कथित नफा आणि मूळ रक्कम सोडवण्यासाठी आणखी ३० लाख रुपये ‘सिक्युरिटी डिपॉझिट’ म्हणून जमा करावे लागतील, अशी मागणी सिया आणि तिच्या साथीदारांनी केली. मात्र, आधीच मोठी रक्कम अडकल्यामुळे तक्रारदाराने आणखी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडला आणि गुंतवलेली मूळ ५६ लाखांची रक्कमही परत केली नाही.
पौड पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू
आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पौड पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी ‘सिया’ नावाच्या कथित महिलेसह तिच्या इतर अज्ञात साथीदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, संबंधित बनावट ट्रेडिंग ॲप, सोशल मीडिया जाहिरात, बँक खात्यांचे व्यवहार आणि आरोपींच्या नेटवर्कचा शोध घेतला जात आहे. शेअर बाजारात कमी वेळात अवाजवी नफा मिळवून देणाऱ्या सोशल मीडियावरील कोणत्याही जाहिरातींना किंवा अज्ञात व्यक्तींच्या सल्ल्याला बळी पडू नका. अधिकृत आणि सेबी (SEBI) नोंदणीकृत प्लॅटफॉर्मवरूनच गुंतवणूक करा.

