त्या अभिनेत्रीची एक पोस्ट आणि मुख्यमंत्री शिंदे धावले मदतीला
'चार कागद, दोन सह्या, एक शिक्का” ते “चार हात, दोन फोन, एक नाथ' बघा काय घडल?
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- मराठी टेलिव्हिजनविश्वातील अभिनेत्री राधिका देशपांडे ही मधल्या काही काळापासून चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. राधिका तिच्या अभिनयापेक्षा जास्त तिच्या खोचक सोशल मीडिया पोस्टमुळे अधिकच गाजत आहे. राधिकाने गेल्या काही दिवसांपूर्वी शासनाचा हॉल सवलतीच्या दरात मिळत नसल्याबद्दल आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणावर मोठा संताप व्यक्त केला होता.
राधिकाने लहान मुलांसाठी नाटकाची एक कार्यशाळा घेतली होती. यात त्यांनी बसवलेले नाटक त्यांना लोकांपुढे सादर करायचे होते, मात्र त्यांना शासनाचा एकही हॉल मिळत नव्हता. अशातच राधिकाने संतापात एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टनंतर काय झाले याबाबत तिने आता दुसरी एक पोस्ट शेअर केली आहे. राधिका देशपांडेने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “चार कागद, दोन सह्या, एक शिक्का” ते “चार हात, दोन फोन, एक नाथ.” “सियावर रामचंद्र की जय” मी १८ एप्रिल ला माझी बाजू मांडत एक पोस्ट केली होती. त्या व्हायरल झालेल्या सोशल मीडिया पोस्टचा हा उत्तरार्ध. मी मागच्या पोस्ट मध्ये म्हणाले होते, “मी माघार घेतला, हार मानली नाही. माझी मुलं आणि मी नाटक करणार, हॉल मिळणार, दणदणीत प्रयोग आम्ही करणार पण माझ्या सकट बाल कलाकारांसाठी ज्यांनी हॉल उपलब्ध करून दिला नाही, त्रास नाही तर छळ केला त्यांना हे उद्याचे नागरिक धडा शिकावल्याशिवाय राहणार नाहीत.” तसेच घडले. ताजे टवटवीत फोटो आहेत, आठवणींच्या पेटीत मऊ मखमली शालीत ठेवण्यासारखे. त्यात आहेत नेते, अभिनेते, मंत्री, महामंत्री , प्रचारक, स्वयंसेवक, महागुरू आणि डॉक्टर. फोटो वर्तमानातला आहे. पण ह्यात मला भविष्यातली बलशाली पिढी घडताना दिसते आहे. “देश बदल रहा है, तरक्की सुनिश्चित है”, असं मला दिसतं आहे. पार्श्वभूमी अशी की मी बालनाट्य शिबिरासाठी हॉल शोधत होते. सरकार वर नव्हे तर सरकारी कामगार वर्गाच्या काम करण्याच्या पद्धतीवर नाराज होते. कामात कामचोरी, हलगर्जीपणा, बेशिस्त वागणं आणि उद्धट बोलणं खपवून घेणं मला जमलं नाही, जमत नाही. माझ्यावर अन्याय होतो आहे, माझ्या कामात अडथळा आणला जातो आहे हे लक्षात येता मी आवाज उठवला. आणि सरकार कडून त्वरित कारवाई सुरू झाली. अशी भलीमोठी पोस्ट तिने केली आहे. दरम्यान या पोस्टसोबत राधिकाने एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये काही बालकलाकार, भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि इतर नेतेमंडळी दिसत आहेत. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
या पोस्टमधून राधिकाने सर्वांचे आभार मानत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील धन्यवाद म्हटले आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिचे आणि तिच्या नाटकाचे कौतुक केले आहे. तिची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.