आमच्या मनातील मुख्यमंत्री फक्त देवेंद्र फडणवीसच, तर शिंदे…
भाजपाच्या दबावात शिंदेंची कोंडी, भाजप मंत्र्यांच्या दाव्याने राजकारण तापणार?
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्याचे मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरीही भाजपाकडुन मात्र सातत्याने आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असे सांगून शिंदेंची कोंडी करण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे गटाला तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे. राज्यात मुख्यमंत्री पदावरून राजकीय घमासान सुरु असताना भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री मानत नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. त्यामुळे चर्चा सुरु झाली आहे.
‘आमच्या मनातील मुख्यमंत्री फक्त देवेंद्र फडणवीसच’ असल्याचं विखे पाटील म्हणाले आहेत. शिर्डीमध्ये राहाता तालुका प्रेस क्लबतर्फे आयोजित मिट द प्रेस या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे. विखे पाटील यांना अजित पवार यांच्या मनात काय? असा सवाल विचारण्यात आला होता. यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, शरद पवार हे अवघ्या महाराष्ट्राला संभ्रमात टाकतात. पण, या वेळी अजित पवार यांनी स्वत: शरद पवार यांनाच संभ्रमात टाकले आहे. त्यामुळे कोणाच्याच मनाचा तळ लागत नाही. कोणाच्या मनात काय चालले आहे कळत नाही. यावर तुमच्या मनातील मुख्यमंत्री कोण? असा सवाल विखे पाटील यांना उपस्थित करण्यात आला. यावर ते म्हणाले, राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नक्कीच चांगले नेते आहेत. पण आमच्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस हेच आहेत, असे उत्तर दिले. त्यामुळे खरा मुख्यमंत्री कोण? या चर्चेला आता उधान आले आहे. भाजपच्या नेत्यांकडून वारंवार अशा पद्धतीने वक्तव्य केली जात असल्याने मुख्यमंत्री पदावरून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अंतर्गत कलह आहे का असा सवालही उपस्थित केला जात आहे.भाजपाकडुन याआधीही चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, नवनीत राणा यांनी आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असे विधान केले आहे. त्यामुळे शिंदे गटाची गोची झाली आहे. अद्याप शिंदे गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
राज्यातील युती सरकारचे नेतृत्व शिंदे करत असले तरी फडणवीस यांच्याकडेच या सरकारचा रिमोट कंट्रोल असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. याचदरम्यान, भाजपच्या नेत्याकडून मुख्यमंत्रीपदावरुन सातत्याने विधाने केली जात आहेत. यामुळे भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. पण यामुळे फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वाढली आहे.