संतापजनक! मणिपूर मध्ये महिलांची विवस्त्र अवस्थेत धिंड
संतापजनक घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, सर्वोच्च न्यायालय संतापले, संसदेत चर्चा होणार?
मणिपूर दि २०(प्रतिनिधी)- मणिपूर मधील हिंसाचाराच्या घटना समोर येत असताना आता अतिशय निंदनिय आणि माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मणिपूरमध्ये भररस्त्यात महिलांवर सामुहिक अत्याचार करून त्यांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
मणिपूरची राजधानीपासून जवळ असलेल्या थौबाल जिल्ह्यातील ही घटना आहे. व्हायरल व्हिडिओ मे मधील असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, दोन महिने उलटूनही अद्याप आरोपींना अटक झाली नव्हती. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने कारवाई न केल्यास आम्हाला कारवाई करावी कागेल असा इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणात मणिपूर पोलिसांनी ३३ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात बलात्कार आणि हत्येची कलमं दाखल करण्यात आली आहेत. पोलीस अटक करण्यात आलेल्या आरोपीची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान मणिपूर मधील महिलांच्या विवस्त्र धिंडेचे व्हिडीओ शेअर न करण्याचे आदेश भारत सरकारने सर्व सोशल मीडीया प्लॅटफॉर्मला दिले आहेत.
दिल्लीमध्ये सुरू होणार्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मणिपूर मधील हिंसाचाराची चर्चा होणार आहे. सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी मणिपूरचा मुद्दा उपस्थित केला. यावर आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत, असे केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले होते. गेल्या तीन महिन्यापासून मणिपुरमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे.