
मुख्यमंत्र्यांच्या बहिणीवर पोलीसांची क्रेनने उचलत कारवाई
व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, कारवाईमुळे चर्चांना उधाण
हैद्राबाद दि ३०(प्रतिनिधी)- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या बहिणीची कार हैदराबाद पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने उचलल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. जगन यांची बहीण वायएसआरटीपीच्या प्रमुख शर्मिला रेड्डी कारमध्ये असताना हा संपूर्ण प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील सोमाजीगुडा परिसरात ही घटना घडली. शर्मिला यांनी वेगळ्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यामुळे शर्मिला रेड्डींनी केसीआर यांच्या घराला घेराव घालण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आंदोलन करत असलेल्या शर्मिला यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.आंदोलनात शर्मिला रेड्डी स्वत:चं एसयूव्ही कार चालवत होत्या. पोलीसांनी शर्मिला यांची गाडी उघडण्याचा प्रयत्न केला असता शर्मिला यांनी कार आतून लॉक केली. पोलिसांनी लॉक तोडण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी कार टो केली.
एक दिवसापूर्वीच अज्ञातांनी शर्मिला यांच्यावर हल्ला केला होता. त्यांच्याविरोधात शर्मिला गो बॅक अशा घोषणा दिल्या. घोषणाबाजी करणाऱ्यांनी ज्वलनशील पदार्थ टाकून बस पेटवली. त्यावेळी बसमध्ये २० जण होते. ते वेळीच खाली उतरले. त्यामुळे अनर्थ टळला होता.