(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी १ लाख ७० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिघी पोलीस ठाण्यातील पोलिस हवालदाराला रंगेहाथ पकडले. अमोल दशरथ जाधव (वय ४३) असे अटक केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याबाबत एका ४२ वर्षाच्या नागरिकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
चर्होलीतील चोविसावाडी येथे तक्रारदार यांनी बिल्डरकडून फ्लॅट खरेदी केला होता. परंतु, बिल्डरने हा फ्लॅट परस्पर दुसर्याला विकून तक्रारदार यांची फसवणूक केली होती. बिल्डरविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत दिघी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जावरुन बिल्डरवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यास मदत करुन पुढील योग्य ती मदत करण्यासाठी पोलीस हवालदार अमोल जाधव याने तक्रारदार यांच्याकडे २ लाख रुपयांची लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी १६ व १८ जुलै करण्यात आली. त्यात हवालदार जाधव यांनी तडजोडीअंती १ लाख ७० हजार रुपये स्वीकरण्याची तयारी दर्शविली. आळंदी – विश्रांतवाडी रोडवरील वडमुखवाडी येथे गुरुवारी दुपारी तक्रारदाराकडून १ लाख ७० हजार रुपये घेताना हवालदार जाधव याला पकडण्यात आले. दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.