पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) उमेदवार बापू पठारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) सुनील टिंगरे यांच्यातील लढत चुरशीची झाली.या लढतीत सुनील टिंगरे यांचा पराभव झाला आहे. बापू पठारे यांचा पाच हजार मतांनी विजय झाला आहे. कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरण सुनील टिंगरेंना भोवले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी आमदार टिंगरे हे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून निवडणूक लढवीत होते. मात्र काही महिन्यांपूर्वी झालेले पोर्शे कार अपघात प्रकरण त्यांच्यासाठी अडचणीचे ठरले. निवडणूक प्रचारात या प्रकरणाचा वापर करून विरोधक त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत होते.या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसतानाही विनाकारण याचे राजकारण केले जात असल्याने टिंगरे यांनी माझी बदनामी केली तर न्यायालयात खेचीन असा इशारा दिला होता. कुठेतरी हे याचा परिणाम मतांवर झाल्याची चर्चा मतदारसंघात आहे.
पोर्शे प्रकरणाने बापू पठारेंना तारले असे म्हणता येईल. कारण बापू पठारेंचा विजय हा अवघ्या पाच हजार मतांनी झाला आहे. मतदारसंघातील भाजपचे इच्छुक उमेदवार जगदीश मुळीक यांनी देखील टिंगरेंवर कल्याणीनगर प्रकरणात टीका केली होती.निवडणुकीच्या प्रचारावेळी कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोप, शरद पवारांना पाठवलेली नोटीस ही प्रकरणे विरोधी पक्षांनी लावून धरली होती. २०१९ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) सुनील टिंगरे यांनी जिंकली होती. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार जगदीश मुळीक यांचा ४९५६ मतांच्या फरकाने पराभव केला होता.