Latest Marathi News
Ganesh J GIF

पुणे पोलीसांकडुन दहशत माजवणाऱ्या डॅनी गँगची धिंड

धिंड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल, दरोड्याचा तयारीत असताना ठोकल्या बेड्या, मोठी कारवाई

पुणे दि ६(प्रतिनिधी)- पुण्यात कोयता गँगची दहशत काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. अनेक ठिकाणी कोयते नाचवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. पण आता पुणे पोलीसांनी याविरोधात कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्यांनी ज्या ठिकाणी दहशत माजवली त्यांची तिथेच धिंड काढली जात आहे.

कोयत्याच्या सहाय्याने कॉलेज परिसरात दहशत निर्माण करू पाहणार्‍या डॅनी टोळीला पोलिसांनी आपला खाक्या दाखवत कॉलेज परिसरातच धिंड काढली आहे. कुणाल कानगुडे आणि ओंकार ननावरे ऊर्फ डॅनी या दोघांचा गेल्या काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यातूनच कुणाल याने डॅनीला कोयता दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार आबासाहेब गरवारे कॉलेज परिसरात घडला होता. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला कोयता फिरविणार्‍या कुणाल कानगुडेला अटक केली. यावेळी डॅनी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती मिळाली. मग पोलीसांनी त्याच्या टोळीच्याही मुसक्या आवळल्या. शिवाजीनगर आणि डेक्कन पोलिसांना ते दरोड्याच्या तयारीत असताना नदीपात्रात मिळून आले. पोलीसांनी गौतम उर्फ लखन अंबादास बनसोडे, राम विलास लोखंडे, सुनिल बाबासाहेब कांबळे, अश्रू खंडु गवळी, रोहन किरण गायकवाड, रोहित चांदा कांबळे, किरण सिताप्पा खेत्री, ओंकार उर्फ डॅनी बाळु ननावरे, शाम विलास लोखंडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे कोयता, स्टील रॉड, मिरचीपुड, नायलॉन दोरी, मास्क, चाकु असे शस्त्र मिळून आली आहेत.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल, सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत कुवर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस, पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस अहिवळे, पोलीस उपनिरीक्षक मीरा कवटीकवार यांनी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!