
महाराष्ट्र सध्या भीषण उष्णतेच्या लाटेत होरपळून निघत असताना एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात शेतात काम करणाऱ्या एका महिला मजुराचा अचानक मृत्यू झाला आहे. हा मृत्यू उष्माघातामुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून, आंबेगाव तालुक्यातील हा उष्माघाताचा पहिला संशयित बळी मानला जात आहे.

नेमकी घटना काय?

नकुशा बाळू सुपे असे मृत महिलेचे नाव आहे. त्या आंबेगाव तालुक्यातील आमोंडी येथे शेतमजुरीसाठी आल्या होत्या. सध्या कांद्याचा हंगाम असल्याने त्या दुपारच्या कडक उन्हात शेतात काम करत होत्या. दुपारी उन्हाची तीव्रता टोकाची असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या जागीच कोसळल्या.
सोबत असलेल्या कामगारांनी त्यांना तात्काळ शिनोली येथील खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर प्रकृती बिघडल्याने घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा
घोडेगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी हा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र, मृत्यूचे अधिकृत कारण स्पष्ट होण्यासाठी मृतदेह मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतरच याला अधिकृत दुजोरा दिला जाईल. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विदर्भात पारा ४२ अंशांच्या पार
पुणे जिल्ह्याप्रमाणेच विदर्भातही सूर्य आग ओकत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तापमान ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. वाढत्या उष्णतेमुळे प्रशासनाने खालील उपाययोजना केल्या आहेत:जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी खास ‘कोल्ड रूम’ सज्ज करण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी उन्हात जाताना काय काळजी घ्यावी, यासाठी ठिकठिकाणी बॅनर लावून जनजागृती केली जात आहे.
सावधान! प्रशासनाकडून खबरदारीचे आवाहन
एककीडे काही भागात पावसाचे वातावरण असताना दुसरीकडे तापमानाचा पारा चढलेला आहे. अशा स्थितीत नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे:
१. वेळेचे भान: दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो उन्हात बाहेर पडणे टाळा.
२. जलसंजीवन: कामावर असताना किंवा प्रवासात पुरेसे पाणी, लिंबू सरबत किंवा ताक प्या.
३. ही लक्षणे दिसल्यास सावध व्हा: डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळणे किंवा जास्त घाम येणे ही उष्माघाताची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा.

