पुरंदरमध्ये पोलीस निरीक्षकासाठी तीन लाखांची लाच मागणारे एसीबीच्या जाळ्यात
लाचेची मागणी करणारा पुरंदरच्या आमदारचा चुलत भाऊ?राजकीय वर्तुळात खळबळ
पुणे दि १८(प्रतिनिधी)- पुरंदर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यासह साथीदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. पोलिस निरीक्षकाकरिता तब्बल 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली आहे.
अक्षय सुभाष मारणे, आणि गणेश बबनराव जगताप अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. यातील गणेश जगताप हा पुरंदरचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांचा चुलत भाऊ असल्याचे सांगितले जात आहे. तसेच तो युवक काँग्रेसचा प्रदेश महासचिव देखील आहे. जगताप याच्यासह मारणेला अटक केल्यानं राजकीय वर्तुळात देखील प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी सासवड पोलिस स्टेशन येथे तक्रारी अर्ज केला होता. त्यावरून गुन्हा दाखल करण्याकरीता सासवड पो.स्टे. चे पोलिस निरिक्षक घोलप
यांचेकरीता अक्षय मारणे याने तीन लाख रूपये लाचेची मागणी केली त्या लाच मागणीस गणेश जगताप याने मदत होती, यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून याबाबतची कारवाई केली. या घटनेने पुरंदर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चा आता सुरू झाल्या आहेत. तसेच स्थानिक राजकारण रंगण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक क्रांती पवार, पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे, सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद आयचीत यांनी केली आहे.