कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांचा दणदणीत विजय
भाजपाचा कसब्याचा बुरुज ढासळला, ३० वर्षानंतर भाजपाला पराभवाचा धक्का
पुणे दि २(प्रतिनिधी)- अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या तब्बल कसबा पोटनिवडणूकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. तब्बल ३० वर्षानंतर भाजपचा बुरुज ढासळला आहे. कसबा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहे. रासने यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपाच्या हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला.कसब्यात मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. महत्त्वाची बाब म्हणजे, सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ या पेठांमधील मतमोजणी पूर्ण झाल्यावर देखील कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर आघाडीवर होते. धंगेकर यांना ७२५९९ तर रासने यांना ६१७७१ मते मिळाली. कसबा हा भाजपाचा बालेकिल्ल्या होता. एकंदरित भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसने हिसकावून घेतल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा हा मोठा विजय असल्याचं बोलले जात आहे. विजयानंतर अजित पवार, नाना पटोले यांनी धंगेकर यांचे अभिनंदन केले आहे. तर रासने यांनी आपला पराभव मान्य करत पराभवाचे चिंतन करु अशी प्रतिक्रिया दिली आहे. विजयानंतर धंगेकर यांच्यासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.
रवींद्र धंगेकर मागील २५ वर्षांपासून कसबा मतदारसंघातील विविध प्रभागांमधून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. कसब्यातील काही भाग सोडला तर बाकी सगळ्या प्रभागांमध्ये रवींद्र धंगेकरांची चांगली पकड होती. कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपनं सर्व ताकद पणाला लावली होती. महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी प्रचाराला हजेरी लावली होती. शेवटी भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसने हिसकावून घेतला आहे.