Latest Marathi News
Ganesh J GIF

३३ कोटींचे ‘रिटर्न गिफ्ट’!; मराठवाड्यातील ‘या’ लग्नाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा

मराठवाड्यात पार पडलेला एक अनोखा विवाह सोहळा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय बनला आहे. लग्नकार्यात होणाऱ्या अवाजवी आणि भपकेबाज खर्चाला फाटा देत, एका नवरदेवाने आणि त्याच्या कुटुंबाने संपूर्ण गावाला जे अनोखे ‘रिटर्न गिफ्ट’ दिले आहे, त्याची चर्चा आता गावागावांत रंगू लागली आहे. या गिफ्टची एकूण रक्कम थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल ३३ कोटी रुपयांच्या घरात आहे.

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बहादरपुरा गावात २० मे रोजी हा आगळावेगळा विवाह सोहळा संपन्न झाला. छत्रपती संभाजीनगर येथे राहणारे नवरदेव सिद्धेश्वर पेठकर आणि त्यांच्या कुटुंबाने सामाजिक भान जपून गावाला हे अनोखे गिफ्ट दिले आहे. विशेष म्हणजे पेठकर कुटु्ंबाने या लग्नात मुलीकडच्यांकडून हुंडा, सोने-नाणे घेण्यास स्पष्ट नकार दिला होता.

अख्ख्या गावाला १ लाखांचे ‘विमा कवच’!

पेठकर कुटुंबाने या लग्नाच्या निमित्ताने अनोखा आदर्श उभा करताना संपूर्ण ग्रामस्थांचा अपघात विमा काढून दिला आहे. गावातील प्रत्येक नागरिकाचा प्रत्येकी १ लाख रुपयांचा अपघात विमा काढण्यात आला आहे. बहादरपुरा गावातील एकूण ३,४६५ लोकांना हे विमा कवच देण्यात आले असून, यासाठी पेठकर कुटुंबाने तब्बल ३३.६ कोटी रुपयांचे विमा छत्र उभे केले आहे. ग्रामीण भागात अशा पद्धतीची सुरक्षिततेची भेट देण्याची ही कदाचित पहिलीच वेळ मानली जात आहे.

…म्हणून घेतला ‘हा’ कौतुकास्पद निर्णय!

विमा देण्यामागचे कारण सांगताना नवरदेव सिद्धेश्वर पेठकर म्हणाले की, “ग्रामीण भागात सर्पदंश, वीज पडणे किंवा शेतीची कामे करताना होणारे अपघात सर्रास घडतात. अशा अचानक येणाऱ्या संकटामुळे अनेक गरीब कुटुंबे उघड्यावर पडतात, त्यांचा मुख्य आधार हिरावला जातो. हीच अस्वस्थता लक्षात घेऊन आम्ही ग्रामपंचायतीच्या नावावर एक सामूहिक अपघात विमा पॉलिसी घेतली.”

कोणताही भेदभाव न करता, गावाच्या मतदार यादीचा आधार घेऊन, कोणत्याही कागदपत्रांच्या कटकटीशिवाय प्रत्येक ग्रामस्थाला यात समाविष्ट करण्यात आले आहे. ही पॉलिसी पुढील एका वर्षासाठी वैध असणार आहे.

“आम्हाला टाळ्या नकोत, लोकांचे आशीर्वाद हवेत!”

या उपक्रमाविषयी बोलताना सिद्धेश्वर पेठकर भावुक होत म्हणाले, “आपल्या संस्कृतीत दानाचा गाजावाजा केला जात नाही. आम्हाला टाळ्या नकोत, फक्त लोकांचे आशीर्वाद हवे आहेत. आमच्या घरातील आनंदाचा प्रकाश घराबाहेरही पडावा, एवढीच आमची इच्छा होती.” तर नवरदेवाचे मोठे भाऊ अनुप पेठकर म्हणाले, “या परिसरात अपघातांचे प्रमाण मोठे आहे. लग्न फक्त आठवणीत राहण्यापेक्षा गावाला सुरक्षा देणारे ठरावे, असा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता.”

गावाकडून पेठकर कुटुंबाचे आभार

या ऐतिहासिक विवाह सोहळ्याला सुमारे ४,५०० पाहुणे उपस्थित होते. गावातील नागरिक मोहन शेकापुरे यांनी कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की, “संपूर्ण गावाला लग्नाचा मान म्हणून सुरक्षेची मोठी भेट मिळाली आहे. असे गिफ्ट आम्ही आमच्या आयुष्यात कधीच पाहिले नव्हते.” गावाचे सरपंच बळीराम पेठकर यांनीही पेठकर कुटुंबाच्या या अनोख्या आणि कौतुकास्पद उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!