‘बलात्कार हे राजकीय हत्यार, असे सावरकरांचे विचार होते’
शिवानी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याने वादंग, वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल, बघा वाद
चंद्रपूर दि १५(प्रतिनिधी)- काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांची कन्या तथा प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांचा एक व्हिडीओ तुफान वायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिवानी वडेट्टीवार यांनी, बलात्कार हे राजकीय शस्त्र असून हे शस्त्र तुम्ही आपल्या राजकीय विरोधात वापरले पाहिजे, असे सावरकरांचे विचार होते असे म्हटले आहे. यामुळे राज्यात नवीन वादंग निर्माण झाले आहे.
माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार एका कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजपच्या सावरकर गौरव यात्रेवर खोचक टीका केली. ही लोकं फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारांवर कधीच मोर्चा काढणार नाहीत. तर कुठला मोर्चा काढतात तर… सावरकर मोर्चा. महिलांना भीती वाटत असेल तर काय उपयोग? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आपल्या भाषणात सावरकरांवर टीका करताना शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या, बलात्कार हे राजकीय शस्त्र आहे. हे शस्त्र राजकीय विरोधात वापरायला हवे, असे सावरकरांचे विचार होते. या विचारांशी प्रामाणिक असलेल्या लोकांपासून माझ्यासारख्या आणि येथे असलेल्या महिलांनी सुरक्षित कसे समजावे? असा प्रश्न सु्द्धा त्यांनी उपस्थित केला आहे. त्यानंतर ‘सावरकरांनी ‘सहा सोनेरी पाने’ या त्यांच्या पुस्तकात बलात्कार हे राजकीय हत्यार आहे हे विकृत विधान केलेलं आहे. ज्यांना पुरावा पाहिजे त्यांनी ते पुस्तक वाचावे’, असं ट्विटही शिवानी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. या वक्तव्यानंतर आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले आहे.
सात्यकी सावरकर हे शिवानी वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले, मी शिवानी वडेट्टीवार यांचा व्हिडीओ बघितला. त्या व्हिडीओत अतिशय चुकीचं विधान करण्यात आलं आहे. सावरकरांनी असं कोणतंही वाक्य सहा सोनेरी पानं या पुस्तकात लिहिलेलं नाही. त्यांनी तसं स्टेटमेंट काढून दाखवावं. असं कोणतंही स्टेटमेंट या पुस्तकात नाही. असा दावा सावरकरांच्या नातूने केला आहे.