Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे गटाच्या या आमदाराला ठार मारण्याची धमकी

महिलेने घेतली हत्येची सुपारी, राजकीय वर्तुळात खळबळ, मुख्यमंत्र्यांना भेटणार

छ. संभाजीनगर दि १५(प्रतिनिधी)- राजकीय नेत्यांना धमकी देण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संजय राऊत, नितिन गडकरी यांच्यानंतर शिंदे गटातील वैजापूर- गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांना ठार मारण्याच्या धमकीचे पत्र आल आहे. या प्रकरणी बोरनारे यांनी वैजापूर पोलीस स्थानकात तक्रार देत चौकशीची मागणी केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडात वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे हे देखील सहभागी झाले होते. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून पोस्टाद्वारे अज्ञात व्यक्तींनी त्यांना धमकावण्याचे पत्र पाठवले आहे. हे पत्र गुरूवारी बोरनारे यांच्या कार्यालयात प्राप्त झाले होते. या पत्राचे तालुक्यात तीव्र पडसाद उमटले असून तर्कवितर्काना उधाण आले आहे. सध्या वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी सुरू आहे. आमदार बोरनारे हे मतदार व शेतकऱ्यांचा गाठीभेटी घेण्यासाठी संपर्क मोहिम राबवत आहेत. असे असतांना हे धमकीचे पत्र आले आहे. दरम्यान पत्रात अज्ञात व्यक्तीने बोरनारे यांना ठार मारण्याची सुपारी एकाला दिल्याचे म्हटले आहे. काही लोकांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका महिलेची मदत घेतली असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. राजकीय बरोबरच बोरनारे यांच्या घरातही वाद आहे. त्यांच्या भावजयीने देखील त्यांचेवर अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. महालगाव येथे आदित्य ठाकरे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा देखील त्यांचेवर आरोप झाला आहे.त्यामुळे अनेक कारणांनी बोरनारे वादात सापडले होते.

धमकीच्या पत्राने एकच खळबळ उडाली असून बोरनारे यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. तसेच या धमकी पत्राची चौकशी देखील सुरू करण्यात आली आहे. ही धमकी नेमकी कुणी आणि हे अद्याप समजू शकलेल नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!